ठाणे : उल्हासनगरमध्ये आयोजित एका निवडणूक प्रचार सभेत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि त्यांच्या घटक पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा पार पडली, ज्यामध्ये कवाडे यांनी हे विधान केले.
जयदीप कवाडे यांनी आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. कवाडे म्हणाले, "लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आता महानगरपालिकेच्या निवडणुकीतही उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे बेईमान नेते खोटा प्रचार करत आहेत. विरोधकांकडून असा प्रचार केला जात आहे की, जर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि त्यांची आघाडी सत्तेवर आली, तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलून टाकतील."
विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देताना जयदीप कवाडे यांची जीभ घसरली. त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारले, "मला सांगायचं आहे उद्धव ठाकरे साहेब, संविधान बदलणे हे काय नवरे बदलण्याइतक सोप आहे का?" त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.