Iran Iraq US war impact on MSME : इराण-इराक-अमेरिका युद्धाचा लघुउद्योगांना फटका

70 टक्के परप्रांतीय कामगार परतले आपल्या गावी; कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर
Iran Iraq US war impact on MSME
इराण-इराक-अमेरिका युद्धाचा लघुउद्योगांना फटकाpudhari photo
Published on
Updated on

सापाड : योगेश गोडे

इराण-इराक-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली शहरात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे इंधन आणि गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात गॅस सिलिडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्याचा फटका लघु उद्योग, हॉटेल व्यवसाय, तसेच विविध उत्पादन क्षेत्रांना बसला असून, शहरातील सुमारे 70 टक्के परप्रांतीय कामगारांनी आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कल्याण-डोंबिवली हे औद्योगिक आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर मानले जाते. येथे हजारो लघुउद्योग, छोटे कारखाने, हॉटेल्स, ढाबे आणि किरकोळ दुकाने मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतातून, विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यांतून आलेल्या कामगारांची मोठी संख्या काम करत होती. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याने या सर्व व्यवसायांची कंबर मोडली आहे.

गॅस सिलिंडर हा हॉटेल व्यवसाय, फूड इंडस्ट्री, तसेच काही उत्पादन प्रक्रियांसाठी अत्यावश्यक घटक आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक हॉटेल्सना स्वयंपाक बंद करावा लागला, तर कारखान्यांमध्ये उत्पादन थांबवावे लागले. काही ठिकाणी तर मालकांनी व्यवसाय तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

Iran Iraq US war impact on MSME
Lote ratnagiri News : लोटे औद्योगिक वसाहत संकटात

सामान्यतः या कामगारांना दरमहा 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. मात्र, व्यवसाय बंद असल्यामुळे मालकांना वेतन देणे शक्य नसल्याने अनेक कामगार आर्थिक संकटात सापडले. अशा परिस्थितीत, विनावेतन शहरात राहण्यापेक्षा मायदेशी परत जाणे अधिक सोयीचे असल्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांनी रेल्वे आणि इतर मार्गांनी आपापल्या गावी परतण्यास सुरुवात केली आहे.

यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये कामगारांची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. रस्त्यांवरील फूड स्टॉल्स, छोटी हॉटेल्स, तसेच काही कारखाने पूर्णपणे बंद पडलेले दिसत आहेत. काही ठिकाणी कामगार नसल्यामुळे व्यवसाय सुरू ठेवणे शक्य नसल्याचे चित्र आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. या संदर्भात कारखाना कामगार मोहन वर्मा यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना सांगितले की, “येथे राहून काहीच काम नाही आणि पगारही मिळत नाही. त्यामुळे गावाकडे जाणे हाच एक पर्याय उरला आहे.

परिस्थिती सुधारली तर पुन्हा परत येऊ.” तर कामगार संजोग गुप्ता यांनी सांगितले, “महागाई वाढली आहे, खर्च भागवणे कठीण झाले आहे. काम नसल्यामुळे शहरात राहणे अशक्य झाले आहे. अमन पंडित म्हणाले, “कोरोनाच्या काळात जसे घडले, तसेच पुन्हा होत आहे. आम्हाला स्थैर्य हवे आहे, पण सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नाही.” गॅस टंचाईमुळे उद्योगधंदे कधीपर्यंत बंद राहतील हे माहीत नाही, मात्र तोपर्यंत शहरात राहणे कठीण होऊन जाईल. त्या उलट गावी गेलो तर परिवारासोबत सुखाचे क्षण घालवू शकू, असे राजेश कुमार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले. तर, काम नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घ्यावा लागला.

परिस्थिती बदलली की पुन्हा येऊ मात्र तोपर्यंत येथे राहणे कठीण आहे. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी दीर्घकालीन धोरणांची आवश्यकता आहे. पर्यायी इंधन स्रोतांचा वापर, स्थानिक उत्पादन वाढवणे, तसेच पुरवठा साखळी मजबूत करणे यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत अभ्यासक गणेश पाटील यांनी व्यक्त केले.

Iran Iraq US war impact on MSME
Gas Cylinder Supply Satara: टंचाईच्या धास्तीने जिल्हा ‌‘गॅस‌’वर

इराण-इराक-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याने कल्याण-डोंबिवलीतील उद्योग-व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. परिणामी, परप्रांतीय कामगारांच्या स्थलांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

“गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. उत्पादन थांबवावे लागल्यामुळे आम्हाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कामगारांना पगार देणे शक्य नसल्याने तेही मायदेशी परतत आहेत. ही परिस्थिती दीर्घकाळ राहिली, तर उद्योग क्षेत्रासाठी गंभीर परिणाम होऊ शकतात.”

चंद्रमोहन कुमार, कारखाना मालक.

“आमच्या कारखान्यात 40 ते 50 कामगार काम करत होते. मात्र, सध्या उत्पादन बंद असल्यामुळे सर्वांना सुट्टी द्यावी लागली आहे. आमचा व्यवसाय गॅसवर अवलंबून आहे. कामगारांनाही त्यांच्या कुटुंबाचा विचार करून गावाकडे जाणे भाग पडले आहे.”

महादेव गुप्ता, कारखाना मालक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news