

अनुज जोशी
खेड : मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता कोकणातील औद्योगिक क्षेत्रावर दिसू लागला असून, खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत गंभीर संकटात सापडली आहे. नैसर्गिक वायू आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर झालेल्या परिणामामुळे येथे असलेल्या तीसपेक्षा अधिक कारखान्यांनी उत्पादन घटवले आहे.
गॅस पुरवठा खंडित झाल्याने अनेक उद्योगांचे उत्पादन पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा आली असून, अनेकांना घरवापसी करावी लागत आहे. कारखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर गंभीर सामाजिक परिस्थिती निर्माण होत आहे.
आखाती देशात युद्ध सुरू झाल्यांनतर त्याचा थेट परिणाम जागतिक उत्पादन उद्योगावर होत आहे. जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे. आयात-निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने उद्योगांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारखान्यातून कामगारांना जेवण व नाश्ता देण्याची व्यवस्था करणे कारखानदारांना शक्य होत नाही. त्यामुळे कामगारांचे हाल होऊ लागले आहेत. त्याचच फटकांतून लोटे औद्योगिक वसाहतीत आलेल्या कामगारांना घरी जेवण बनवण्यासाठी देखील अडचणी येत असल्याने त्यांनी आपल्या गावांकडे जाणे पसंत केले असून लवकर परिस्थिती सुधारली नाही तर कामगारांच्या उपलब्धते अभावी देखील कारखान्यांच्या उत्पादन प्रक्रियांवर परिणाम होणार आहे.
खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी बुधवारी (दि. १८) लोटे येथील उद्योग भवनात उद्योजकांसोबत बैठक घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली. या बैठकीला महानगर गॅस कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीत पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याचा पर्याय प्रशासनाने पुढे ठेवला आहे. मात्र, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या तातडीच्या संकटावर हा उपाय कितपत उपयोगी पडेल, याबाबत उद्योजकांनी शंका व्यक्त केली आहे.
सध्या उद्योगांसमोर अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे. गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवणे कठीण झाले आहे. कच्चा माल वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक कारखाने अर्धवट क्षमतेवर चालत आहेत. जर ही परिस्थिती आणखी काही काळ कायम राहिली, तर अनेक उद्योग बंद पडण्याची भीती लोटे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा फटका स्थानिक उद्योगांना बसत आहे. कामगारांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असून, त्यांचे रोजगार धोक्यात आले आहेत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पर्यायी गॅस पुरवठा आणि कच्च्या मालाची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी मागणी लोटे-परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी राजकुमार जैन यांनी केली.