Illegal Entry Local Train Coaches
पोस्टर्सद्वारे अंधश्रद्धेचा फैलाव रोखणार कोण ? (Pudhari File Photo)

Illegal Entry Local Train Coaches | महिलांच्या लोकल डब्यांत बंगाली बाबांची घुसखोरी

Poster Campaign | पोस्टर्सद्वारे अंधश्रद्धेचा फैलाव रोखणार कोण ? रेल्वे प्रशासन/सुरक्षा बल/पोलिस अनभिज्ञ ?
Published on

Train Security Issue

डोंबिवली : सार्वजनिक स्वच्छतागृहांसह लोकल डब्यांमध्ये बंगाली बाबांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मध्य रेल्वेत मिर जी बंगाली बाबा, तर पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये बाबा उमर खान यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. जागोजागी पोस्टर्स चिटकवून अंधश्रद्धेचा फैलाव करणाऱ्या अशा फुकटचंबू जाहिरातदारांवर कुणाचाही वचक राहिलेला दिसून येत नाही. रेल्वे प्रशासन, सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस अशा भोंदाड बाबांच्या गोरखधंद्यांपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.

लव प्रॉब्लेम, शादीमें रूकावट, प्यारमें धोखा, पती-पत्नीमें अनबन, गृह क्लेश, तलाक जैसी समस्याओं का समाधान । निराश माता बहने एक बार जरूर फोन करें या मिलें । नोट : प्यार में धोखा खाए निराश हो चुके प्रेमी प्रेमीका एक बार जरूर कॉल करें । (100% Result मात्र 24 घंटे के अन्दर) | 100 % PRIVACY WORK असे आवाहन करणारी पोस्टर्स खास करून महिलांच्या डब्यांत आढळून येत आहेत.

Illegal Entry Local Train Coaches
Dombivali News | डोंबिवलीतील पोस्ट- पासपोर्ट ऑफिस समोरचा सिमेंट काँक्रिट रोड तोडला

पूर्वी लोकल डब्यांतून बंगाली बाबा, तांत्रिक, लव गुरु अशा जाहिराती विपुल प्रमाणात चिटकवेल्या दिसत असत. अर्थात आताही अनेक ठिकाणी दिसत आहेत. अशा जाहिरातींचे पोस्टर्स या बंगाली बाबांचे हस्तक लोकलच्या महिला डब्यांमध्ये घुसून कुठे आणि कधी चिटकवतात ? हा देखील संशोधनाचा विषय आहे. बहुदा लोकल गाड्या कारशेडला लागतात, तेव्हा हे बाबांचे हस्तक डब्यांमध्ये घुसून आपला कार्यभाग साधत असावेत, असा कयास आहे.

प्रेमात सफलता, वशीकरण असे उल्लेख असलेल्या जाहिरातींना भुलून आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला होकार द्यावा किंवा एखादी व्यक्ति आपल्याला वश व्हावी या उद्देशाने अनेक जण जाहिराती वाचून बाबांनी सांगितलेल्या ठिकाणी गेले. बाबांनी कुणाचे भले केल्याचे ऐकिवात नाही, उलट त्यांच्याकडे जाणाऱ्यांची लूट झाली. अशा भोंदाड बाबांकडे जाऊन फायदा होण्याऐवजी फसगत झालेल्या अनेकांच्या तक्रारी आहेत. महिला आणि तरूणींना तर अशा ठिकाणी इतरही धोके असतात. एकदा मनात एखादी बाब अथवा ‘टार्गेट’ रूतून बसले की इतर काही सुचत नाही. झपाटलेल्या अवस्थेत कोणत्याही थराला माणूस जाऊ शकतो. एक गोष्ट नक्की की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम असेलच असे नाही, किंबहुना अशी जबरदस्ती करणे अयोग्य आहेच.

Illegal Entry Local Train Coaches
Dombivali News: बाप्पाच्या मूर्तीचे पैसे घेतले, चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्तिकार पसार; गणेश भक्तांमध्ये संताप

असे तांत्रिक वशीकरण शक्य असेल किंवा नसेल, परंतु या मार्गाने प्रेम किंवा भोग मिळवणे योग्य नव्हे. जातकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन अनेक भोंदू बाबा पैसे उकळत असतील, याकडे तज्ज्ञांनी त्यांचे मत व्यक्त केले. करणी, भानामती, भूत-प्रेतबाधेसारख्या समस्यांपासून सुटका करण्याची हे बाबा खात्री देतात. एकदा कॉल करा, तुमचे जीवनमान बदलून जाईल, असे आवाहन करणाऱ्या बाबांकडे जाऊन आलेल्यांना कितपत फायदा झाला ? हे छातीठोकपणे सांगणारा एकही पुढे आल्याचे ऐकिवात नाही.

गाव-खेड्यांतील लोक लोकलमध्ये घुसले

गाव-खेड्यांत अजूनही भुता-खेतांचा वावर असतो, असे मानले जात असेल तरी अशा खुळचट कल्पनांना छेद देण्यााठी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान दिवसाचे महत्व पोहोचावे, या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्रयत्न केले जातात. तरीही ग्रामीण परिसरातील गाव-पाड्यातील वस्त्यांत आजही अंधश्रद्धा ठासून भरल्याचे दिसून येते. गाव-खेड्यांतील हे लोण आता शहरी भागातून मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्येही घुसल्याचे बंगाली बाबांनी लावलेल्या पोस्टर्सवरून दिसून येते.

समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने मदत घ्यावी

रेल्वे प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एका क्षणात पंधरा प्रवासी बाहेर फेकले जातात, तर लागोपाठ दोन दिवसांत पंधरा प्रवासी अपघातात मृत्युमुखी पडतात. दररोज एक-दोनदा होणाऱ्या अपघातांच्या घटना वेगळ्याच, पण इतक्या मोठ्या समस्या सोडविण्यासाठी आता अशा बंगाली बाबांची मदत तरी घ्यावी, असे उपरोधिक आवाहन तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा तथा उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले. रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी एकदा अशा बाबांची भेट घेऊन खात्री करावी. अशा बंगाली बाबांकडे जर का सगळ्या समस्यांचे समाधान आहे, तर रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचे समाधान देखील त्यांच्याकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही मत लता अरगडे यांनी व्यक्त केले.

रेल्वेची सुरक्षा धोक्यात

इतके पोस्टर ट्रेनमध्ये लावायला संधी कशी मिळते ? या अनधिकृतपणे अंधश्रद्धेचा प्रचार उपनगरीय रेल्वेमधून बिनदिक्कतपणे होत असेल तर सुरक्षितेचे काय ? रेल्वे प्रशासनाने या पोस्टरमध्ये नमूद केलेल्या क्रमांकावर संपर्क साधून संबंधित बाबा बंगाल्यांवर काय कारवाई करणार ? असेही सवाल लता अरगडे यांनी उपस्थित केले आहेत. आता रेल्वे प्रशासन, सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस अशा भोंदू बाबांच्या उपद्व्यापांवर काय कारवाया करतात, याकडे प्रवासी महिलांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news