

डोंबिवली : आधी दोन वेळा गर्भपात झाला, यापुढे मुल झाल्यास जीविताला धोका….म्हणून बाळाचा सौदा...अन् तोही कल्याण तहसील कार्यालयाच्या आवारातच...नवजात बालकाची खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे. या संदर्भात बालकाचे आई वडील आणि अवैध पद्धतीने मुल दत्तक घेण्याच्या तयारीत असलेल्या दाम्पत्याच्या विरोधात टिटवाळ्याच्या तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ठाण्याच्या जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या चाईल्ड हेल्पलाईनद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने एक लाख रूपयांना विक्री करत असल्याची कबुली या बालकाच्या माता-पित्याने पोलिसांना दिली.
जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून अवैध पद्धतीने लहान बालकांची दत्तक प्रक्रिया राबविल्यास तातडीने कार्यवाही करण्यात येते. याच पद्धतीने जिल्हा महिला बालविकास विभागाच्या समन्वयक अधिकारी यांना चाईल्ड हेल्पलाईन माहिती मिळाली होती. एक दाम्पत्य कल्याण तहसील कार्यालयात मुलाची दत्तक प्रक्रिया राबविण्यासाठी परस्पर कागदपत्रे तयार करण्यासाठी येणार असल्याची माहिती कळताच ठाणे जिल्हा सिटी चाईल्ड हेल्पलाईनच्या समन्वयक श्रद्धा नारकर यांनी तत्काळ कल्याण तहसील कार्यालय गाठले. तेथे एक दाम्पत्य त्यांच्या बाळाला दुसऱ्या दाम्पत्याला दत्तक देण्यासाठी उपस्थित असल्याचे लक्षात आले. हा प्रकार गंभीर असल्याने श्रद्धा नारकर यांनी स्थानिक महात्मा फुले चौक पोलीसांची मदत घेतली.
बाळ डोंबिवलीच्या जननी आशिषकडे सुरक्षित
पोलिसांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर बाळाला दत्तक घेणाऱ्या कोळी दाम्पत्याने माहिती उघड केली. मुलगा न झाल्याने त्यांनी त्यांच्या ओळखीच्या दाम्पत्याकडून बाळाला घेण्याचे ठरवले. तर बाळाची विक्री करणाऱ्या दाम्पत्यानेही माहिती दिली. आर्थिक अडचणीमुळे, तसेच आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी बाळाचा सांभाळ करणे शक्य नसल्याने हे बाळ ओळखीच्या दाम्पत्याला देण्याचे ठरविले. त्याबदल्यात एक लाख रूपये घेण्याचे ठरले. त्यापैकी २० हजार रूपये स्वीकारल्याचेही ननवरे दाम्पत्याने कबूली दिली. बाळाचा जन्म २६ सप्टेंबर रोजी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये झाला. सद्या हे बाळ उल्हासनगरच्या जिल्हा बालकल्याण समितीने दिलेल्या निर्देशांनुसार डोंबिवलीतील जननी आशीष चॅरिटेबल ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बाळाच्या खरेदी/विक्रीचे धक्कादायक कारण
बाळाची खरेदी करणाऱ्या कोळी दाम्पत्याने धक्कादायक माहिती दिली. पत्नीचे या आधी दोनदा गर्भपात झाले आहेत. पत्नी पुन्हा गरोदर राहिल्यास तिच्या जीविताला धोका होता. त्यामुळे आम्ही बाळ दत्तक घेण्याचे ठरविले. तर बाळाची विक्री करणारे ननवरे दाम्पत्य बिगारी काम करणारे आहे. त्यांना एक मुलगा आहे. मात्र या बालकाचे पालन-पोषण करण्याची आर्थिक कुवत नसल्याने बाळ दत्तक देण्याचे ठरविल्याचे ननवरे दाम्पत्याने पोलिस चौकशीत सांगितले.