

अंबरनाथ : पत्नी सोबतच्या वादातून पतीने आपले भाड्याचे घर पेटवून दिल्याची घटना अंबरनाथ मध्ये घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी पोहोचून ही आग आटोक्यात आणली. अन्यथा इमारतीला धोका पोहोचला असता.
अंबरनाथ शहराच्या पश्चिमेलाअसलेल्या चिखलोली परिसरातील थारवानी मोन्टाना या इमारतीत कमलेश सुखरामाणी हे पत्नी, एक दोन महिन्यांच्या बाळासोबत भाड्याच्या घरात राहतात. मात्र मंगळवारी सकाळी पत्नी दिव्या सोबत त्यांचा वाद झाला. त्यातून कमलेश यांनी भांडणाच्या रागातून पत्नी दिव्या घर सोडून जाऊ नये यासाठी बाहेरून घर बंद केले व इमारती खाली गेले.
मात्र आपल्याकडील दुसऱ्या किल्लीने कमलेश यांच्या पत्नीने सुरक्षा रक्षकाच्या मदतीने घराचा बाहेरून लावलेला टाळा उघडुन ती शेजाऱ्यांकडे गेली. त्याच वेळेस कमलेश घरी आले तेव्हा पत्नी घर सोडून गेल्याचे समजून रागात आपले घर पेटवून दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सय्यद शब्बीर यांनी दिली. भाडेकरूच्या कोटुंबिक वादातून घर मालकाच्या घराचे व लाखो रुपये किंमतीचे फर्निचर खाक झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.