

डोंबिवली शहर : कडाक्याच्या थंडीने दार ठोठावल्याची चाहूल लागताच शेकोटीभोवती बसून गरमागरम हुरड्याची मेजवानी लुटण्याचा आनंद काही औरच! हिरव्या ज्वारीच्या दाण्यांचा हुरडा, शेंगदाणा-लसूण चटणी, मडक्यातले गोड दही, चुलीवरच्या गरम भाकऱ्या थंडी आणि हुरडा म्हणजे अविभाज्य नातं! गेल्या काही दिवसांत कल्याण आणि डोंबिवली परिसरात हुरडा पार्ट्यांचा धडाका सुरू झाला असून, बाजारातही हुरड्याला मोठी मागणी वाढली आहे.
यंदा पावसाचा अतिरेक झाल्याने ज्वारीचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे हुरड्याची आवक मर्यादित असून, बाजारात भाव प्रतिकिलो 300 ते 350 दरम्यान आहे. आवक घटली असली तरी थंडीने जोर धरताच मागणी मात्र तुफान वाढली आहे. नोव्हेंबरपासून सुरू होणारा हुरड्याचा हंगाम जानेवारीअखेरपर्यंत सुरू राहतो. पण यंदा उत्पादन घटल्याने डिसेंबरपासूनच हुरड्याचे दर चढले असल्याचे विक्रेते सांगतात.
घरोघरीही हुरड्याची खरेदी वाढत असून, शहरात येणारा हुरडा सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर, तर डिसेंबर-जानेवारीमध्ये सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. सध्या बाजारात सुरती हुरडा मोठ्या प्रमाणात येत असून त्याची पारंपरिक चव लोकप्रिय आहे. तर गुळभेंडी हुरडा चवीला नैसर्गिक गोडसर असल्याने त्यालाही चांगली मागणी आहे. गेल्या काही वर्षांत हुरड्याची तयार पाकिटेही बाजारात उपलब्ध होत आहेत. एका पाकिटात एक किलो स्वच्छ धुतलेला, भाजलेला हुरडा दिला जातो.
थंडीत ‘हुरडा पार्टी’चा ट्रेंड पुन्हा जोरात
जवळच्या पर्यटनस्थळांवर, गडकिल्ल्यांवर तसेच महामार्गालगतच्या शेतांमध्ये हुरडा पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. कुटुंब, मित्रमंडळी एकत्र येऊन हुरड्याचा आस्वाद घेत गप्पांची मैफल रंगवण्याचा अनुभव अनेकजण घेत आहेत.