

ठाणे : ठाण्यातील दोन लाख 20 हजार वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज केला, परंतु अद्याप अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसलेली नाही. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सध्या अर्जांची झळाळती भरती पाहायला मिळत आहे, तरीही नागरिकांनी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही प्लेट लावणे अत्यावश्यक असल्याचे ठढज कार्यालयाने आवाहन केले आहे.
बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गुन्हे, चोरीची वाहने, चुकीची ओळख आणि वाहतुकीशी संबंधित गुंतागुंत लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी 4 डिसेंबर 2024 रोजी आदेश जारी केला होता, ज्याअंतर्गत 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांना नवीन नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेला गती मिळाली असून, आतापर्यंत 2,20,000 ऑनलाइनअर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 1,97,000 वाहनधारकांना अपॉइंटमेंट देण्यात आले असून, सुमारे 1,42,000 वाहनधारकांनी यशस्वीरित्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवले आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाने तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. नागरिकांनी अनधिकृत विक्रेत्याकडून प्लेट बसवू नयेत, कारण अशा नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होत नाही आणि त्यामुळे त्याचे कायदेशीर महत्त्व राहत नाही.
वाहन सुरक्षा आणि कायदेशीर नोंदणीसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक झाले आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी जागरूकतेसाठी उपक्रम राबवले जात असून, ठाणेकर नागरिकांचा या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे यांनी सांगितले.
हेमांगिनी पाटील, (प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे)
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, 30 नोव्हेंबर 2025 नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळ न घालवता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा, अपॉइंटमेंट घ्यावी आणि वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावावी. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करावे, वाहनाचा तपशील भरावा, वेळ व केंद्र निवडून अपॉइंटमेंट बुक करावी.