

ठाणे : ठाण्यातील साकेत रोड ते बाळकुम पाडा येथे बेकायदेशीर चरस विक्रीसाठी बाळगल्या प्रकरणी आरोपी शनवर अन्वर अली (३८) हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून त्याच्याकडून पाच कोटी पन्नास लाखांचे चरस जप्त करण्यात आले आहे.
वागळे इस्टेट गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. यावेळी आरोपीच्या ताब्यातील ५ कोटी ५० लाखांचे चरस मुद्देमालासह हस्तगत करण्यात आले. त्याच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाण्यातील साकेत रोड ते बाळकुम पाडा नंबर २ यादरम्यान अली नावाची व्यक्ती चरस हा अमली पदार्थ विक्री करण्याकरिता २१ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचला होता.
दरम्यान वागळे इस्टेट पोलिसांनी अली याच्यावर झडप टाकून त्याला पकडले. त्याच्याकडील बॅगेत ५०५ ग्रॅम वजनाचे दहा पाकीट आणि कपडे आढळून आले. त्या चरस असलेल्या एका पाकिटाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ५० लाख ५० हजार रुपये किंमत असून एकूण ५ कोटी ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
त्या व्यतिरिक्त रोख रक्कम आणि मोबाईल असा ५ हजार ५६५ रुपयांचा ऐवज मिळून आला आहे. अली हा पश्चिम बंगाल येथील असून त्याचा साथीदार हा नेपाळ येथील असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. बेकायदेशीररित्या चरस बाळगल्या प्रकरणी त्याच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मुद्देमाल तो कोणाकडे विक्रीस घेऊन आला होता. तसेच त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असून पुढील तपास वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.