

GST Hike impact on books and publications
ठाणे : पुस्तक प्रदर्शने, संमेलन आणि ऑनलाईनच्या माध्यमातून चालणार्या पुस्तक खरेदीला कोरोनानंतर सध्या अच्छे दिन आले आहेत. पण केंद्र सरकारने कागदावरचा जीएसटी 12 वरून 18 टक्के केल्याने त्याची झळ प्रकाशन व्यवसायाला आणि ग्राहकांकडून मिळणार्या प्रतिसादाला बसणार असल्याने प्रकाशक चिंतेत आहे.
केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेच्या कागदावरील वस्तू व सेवा कर 12 टक्क्यांवरून 18 टक्के केल्याने पुस्तकांच्या किंमती वाढणार आहेत. त्यातच वह्यांवर 0 जीएसटी आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी वह्या आणि पुस्तके तयार करण्यासाठी एकच प्रकारचा कागद वापरात असल्याने वह्या आणि पुस्तकांच्या किंमतीत तफावत निर्माण होणार असल्याने तो गुंता निर्माण होणार आहे.
सध्या अनकोटेड कागदाचा दर सरासरी 74 रूपये किलो आहे. 23 सप्टेंबरनंतर हा दर 79 ते 80 रूपये होणार आहे. कागदावरचा जीएसटी,शिवाय प्रिंटिग वरील 5 आणि 18 टक्के, लॅमिनेशनवरील 18 टक्के जीएसटी यामुळे पुस्तकांच्या किंमतीत वाढ होणार आहे. सध्या कृष्णधवल प्रिटींगचे एक पान 1रूपया 50 किंवा 60 पैशांना पडते. आता जीएसटीच्या वाढीनंतर त्याची किंमत 1रूपया 75 किंवा 80 पैसे होणार आहे. त्यामुळे पुस्तकाच्या किंमतीत कागदाचीच 70 टक्के किंमत अंतर्भूत असते.
पुण्या - मुंबईत वाचक पुस्तक घेताना सहसा किंमत बघत नाहीत. पण ग्रामीण किंवा निमशहरी भागात अजूनही वाचक पुस्तक घेताना किंमतीचा अंदाज घेतात. कागदावरील जीएसटी 6 टक्क्यांनी वाढल्याने 200 पानांचे पुस्तक जे आता 300 रूपयांना मिळते ते आता 375 किंवा 380 रूपयांना होणार आहे. मुलांची पुस्तके तर रंगीत असतात. त्यामुळे 40 पानांचे रंगीत किंमत 120 रूपयांना सध्या मिळते, जीएसटी वाढ लागू झाल्यानंतर त्या पुस्तकाची किंमत 170 ते 180 रूपये होईल. पुस्तकांच्या किंमती वाढल्यानंतर म्हणजे सरासरी 300 - 400 रूपयांचे पुस्तक घेण्याऐवजी वाचक अमुक एका अॅपचे वर्गणीदार होवून 50 चित्रपट पाहण्याला पसंती देतील, असा वाचक डिजिटल माध्यमाकडे वळण्याची शक्यता नक्कीच आहे.
मोहित बर्वे, संचालक - दिलीपराज प्रकाशन