Jitendra Awhad | विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले : डॉ. जितेंद्र आव्हाड 

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी; भविष्यात इथेनॉलविरोधी आंदोलनाचा इशारा
Jitendra Awhad |
जितेंद्र आव्हाड. Pudhari Photo
Published on
Updated on

Jitendra Awhad on CJP Delhi Protest

ठाणे : विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनामुळे सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. या आंदोलनातून देशातील लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही जनमानसात जिवंत असल्याचे दिसून आले. तसेच हा देश महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचारांचा असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर ठाण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, गटनेते अभिजीत पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Jitendra Awhad |
CJP Delhi protest : पोलिसांच्या कथित अमानुष वागणुकीविरोधात सीजेपीचे शुक्रवारी देशव्यापी आंदोलन

आव्हाड म्हणाले, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तातडीने मागे घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना "डिअर फ्रेंड्स" म्हटले असेल, तर आता त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हेही मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा.

देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची प्रतिमा, आर्थिक परिस्थिती आणि इथेनॉलसारख्या विषयांबाबत जनतेमध्ये निर्माण झालेला असंतोष या आंदोलनातून व्यक्त झाला आहे. या आंदोलनामुळे भविष्यातील लोकआंदोलनांना बळ मिळेल आणि सरकारवरील जनतेचा दबाव कायम राहील. यापुढे इथेनॉलविरोधातही आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Jitendra Awhad |
CJP Delhi protest : दिल्लीतील लाठीचार्जचे कल्याण-डोंबिवली महापालिकेत तीव्र पडसाद! मनसेने सत्तेतून बाहेर पडावे- भाजपा

पोलीस कारवाईवर टीका करताना आव्हाड म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततेत सुरू असताना कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नव्हता. तरीही आंदोलकांवर करण्यात आलेली कारवाई अनावश्यक होती. विशेषतः विद्यार्थिनींशी झालेल्या कथित गैरवर्तनाच्या घटनांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा निषेध करत, वर्दी नसलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. आव्हाड यांनी केली.

logo
Pudhari News
pudhari.news