

ठाणे : आधीच वाहतूक कोंडीत अडकलेल्या घोडबंदर मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएच्या वतीने घोडबंदर मार्गावर सेवा रस्ते महामार्गात समावेश करण्याचे काम सुरू असून ४ नोव्हेंबरपासून मुल्लाबाग बसस्टॉप ते पातलीपाडा या दरम्यान हे काम सुरू करण्यात येणार आहे. परिणामी वाहतूक विभागाने ४ नोव्हेंबरपासून या मार्गावर वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग असलेल्या घोडबंदरवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सेवा रस्ते मुख्य हायवेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रकल्प एमएमआरडीएच्या वतीने नियोजित करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाला नागरिकांकडून विरोध करण्यात येत असून दुसरीकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता या प्रकल्पाचा कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. सेवा रस्त्यांवर असलेली मोठी गृहसंकुले, हॉस्पिटल यासाठी या प्रकल्पामुळे मोठ्या अडचणी निर्माण होणार असून सेवा रस्त्यांवर असलेल्या सर्वप्रकारच्या भूमिगत वाहिन्या देखील स्थलांतरित करण्यात आलेल्या नसल्याने हा प्रकल्पच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
घोडबंदर रोडवरील कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ९-९ मीटर सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्याचा एमएमआरडीएचा प्रस्ताव आहे. सेवा रस्त्यांचा वापर फक्त रस्त्याजवळील दुकानदार व काही खासगी गाड्या तसेच टेम्पो, ट्रक, ऑटो रिक्षा पार्किंगसाठी केला जातो. त्यामुळे स्थानिक वाहनचालक सर्व्हिस रोडचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करतात. तसेच सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या गटारावरील ५ ते ६ फूट फुटपाथचा वापर पादचाऱ्यांना होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जर या सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्यात आल्यानंतर घोडबंदरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील काही अंशी सुटणार आहे. आधीच या मार्गावर मेट्रो-४ चे काम सुरू असून आता मुल्लाबाग बसस्टॉप ते पातलीपाडा असे सेवा रस्ते समावेश करण्याचे काम येत्या ४ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक विभागाने मोठे बदल केले आहेत.
असे आहेत वाहतूक बदल
प्रवेश बंद : नीलकंठ ग्रीन, मुल्ला बाग येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या आणि ठाणे येथून मुल्ला बाग आगर मार्गे निळकंठ ग्रीनच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना मुल्ला बाग आगार येथे प्रवेश बंद असेल.
पर्यायी मार्ग : नीलकंठ ग्रीन, मुल्ला बाग येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना हॅपी व्हॅली चौक, मानपाडा जंक्शन येथून वाहतूक करता येईल.
पर्यायी मार्ग : ठाणे येथून मुल्ला बाग आगार मार्गे नीलकंठ ग्रीनच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने मानपाडा जंक्शन, हॅप्पी व्हॅली चौक येथील वाहतूक करतील.