

ठाणे : सुरेश साळवे
शहर आणि विविध राज्यांकडे जाणारा राज्य महामार्ग असलेल्या घोडबंदर रोडवर रोजची होणारी वाहतूक कोंडी पाहता घोडबंदर रोडला वाहतूक कोंडीचा अभिशाप असल्याचे चित्र दिवसाआड पाहायला मिळते. कधी रस्त्यावरील खड्डे, खड्ड्यात साचलेले पाणी, तर कधी भर रस्त्यात पेट घेणार्या कार आणि अपघातग्रस्त वाहने यामुळे मुंबईकडे येणारा घोडबंदर रोड, ठाण्याकडून बोरवलीकडे जाणारा घोडबंदर रोड हा कुठल्या ना कुठल्या कारणास्तव नेहमीच वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेला पाहायला मिळतो.
वाहतूक कोंडी सकाळच्या दरम्यान झाल्यास त्या वाहतूक कोंडीचा परिणाम हा एकीकडे भिवंडीच्या दिशेला तर दुसरीकडे कोपरी चेक नाकापर्यंत वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकलेला अनेकदा नजरेस पडतो. या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वाधिक सार्वजनिक बसमधून कामावर निघालेले चाकरमानी किंवा आपली स्वतःची वाहन घेऊन कामावर निघालेले चाकरमानी तसेच वाहन चालक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातच वाहतूक नियंत्रण करताना वाहतूक पोलिसांची दमछाक झालेली पाहायला मिळते.
पूर्वी घोडबंदर रोडवर रस्त्यांच्या अपुर्या स्थितीमुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान राज्य सरकारने यावर ठोस भूमिका घेत घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होणार्या ठिकाणांवर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मोठे मोठे उड्डाणपूल तयार केले. या उड्डाण पुलावरून आणि घोडबंदर रोडवरून रात्री सुसाट जाणार्या वाहनांच्या अपघातामुळे दुसर्या दिवशी सकाळीच ठाणेकरांना आणि ठाण्याकडे निघालेल्यांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. वाहतूक विभागाद्वारे अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला लावत नाही, तोपर्यंत एक तर वाहतूक संथ गतीने सुरू राहते किंवा वाहतूक ठप्प होते.
मागील दोन दशकात घोडबंदर रोडचा विस्तार आणि सर्व्हिस रोड आदींच्या निर्माण मोठ्या प्रमाणात बदल करून रोड मोठे करण्यात आले त्यातच गाव आणि शहराच्या इंटरलिंक रस्त्यावर जाण्यासाठी वाहनांना अडथळा होऊ नये म्हणून उड्डाणपुलांचेही निर्माण मोठ्या प्रमाणात करण्यात आले, मात्र घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच ठरली असल्याने आमूलाग्र बदल आणि सुसज्ज रस्ते दिल्यानंतरही घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी ही अभिशाप ठरत असल्याचे चित्र आहे. बुधवारी सकाळी पिकअप हवरच्या वेळेसच घोडबंदरकडून बोरवलीकडे जाणार्या वाहिनीवर वाहतुकीचा चक्काजाम झाल्याचे चित्र दिसले.
ही वाहतूक कोंडी कशामुळे होते याबाबत निश्चित कारण स्पष्ट होत नाही. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने दुचाकी आणि चार चाकी खासगी वाहने सर्व्हीस रोडचा आसरा घेत मार्गक्रमण करीत असताना घोडबंदर रोड प्रमाणेच सर्व्हीस रोडही वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेले पाहायला मिळतात. एकीकडे वाहतूक कोंडीत अडकलेल्या चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्याने मिळेल त्या दिशेने वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी वाहने ही वाहतूक कोंडी निर्माण करतात, तर दुसरीकडे थांबलेल्या वाहनांना मार्गच खुला नसल्याने वाहतूक कोंडीचे लोन हे काही किलोमीटर लांबपर्यंत वाहतूक कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसते.
घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून केलेले अनेक प्रयत्न आणि नवनिर्माण यांच्या निर्माण आणि घोडबंदर वरील दोन्ही वाहिनीवर वाहतूक कोंडीचा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळते. वाहतूक कोंडीची कारणे विविध असू शकतात, मात्र वाहतूक कोंडीचा हा वेगळा त्रास वाहन चालकांना भोगावा लागतो.