Ganesh Chaturthi : गौराई येई सोनपावलांनी...
प्रियानी पाटील
गौराई अंगणातून घरात प्रवेशली की, गौरीच्या स्वागताचं पारणं फिटतं. एक अनोखा आनंद हर्ष उल्हासतो आणि श्री गणरायाच्या शेजारीच गौराईचा पाट मांडला जातो. उत्सवाचा खरा झंकार आणि संस्कार येथे उमटतो. एकीकडे गौराईचं आगमन होतं तर दुसरीकडे स्वयंपाक घरातून गौराईसाठी खास बनवलेल्या सुग्रास जेवणाचा दरवळ घरभर पसरतो. तिच्यासाठी नैवेद्याची रास लागते.
आली गवर आली... सोन पावली आली...
तडतड ताशा आणि ढोलांच्या गजरात वाजत गाजत घरोघरी गणराज विराजमान झाल्यानंतर खर्या अर्थाने वेध लागतात ते गौराईचे. गौराईची सोन पावले अंतरी ठसतात. ढोल-ताशांचा नाद अंतरी घुमतो आणि मनात फेर धरू लागतात ती गौराईची गाणी, फुगड्या आणि झिम्माचे दुमदुमणारे खेळ. यावेळी गौराईचे गोड रूपअंतरी ठसते.
गौराईचा साज पाहता सौंदर्याचा खरा साक्षात्कार होतो. भाळी कुंकू, नाकात नथ, कानात बुगडी, केसातील वेण्यांचा साज आणि विविध अलंकारांनी नटलेली गौराई ही गणेशोत्सवाचे रूप खुलवते.
गणेश चतुर्थीनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन घरोघरी होते. गौरी आवाहन हा खास दिवस गौराईच्या घरी आगमनाचा ठरतो. गौरी आवाहनाची तयारीही तितकीच हर्षभरी असते. घरातील यजमाननींना जरा उसंत नसते. गौराईच्या स्वागतापासून तिच्या आसनापर्यंतची सारी तयारी करण्यात ती व्यस्त असते. साज, अलंकार, वस्त्र, साडी नऊवारीपासून गौराईच्या नैवेद्यापर्यंतची सारी तयारी हसतमुखपणे ती निभावते.
जशी प्रत्येक ठिकाणी गणेशोत्सवाची परंपरा न्यारी तशीच गौरी सणाची परंपरा न्यारी. कोकणात तर घरोघरी वसलेल्या गौराईचे प्रत्येक रूप न्यारे आणि आगळेवेगळे भासते. हे रूप गौरी पूजनाच्या वेळी प्रत्येकाच्या अंतरी विलसते. समाधान, सौख्य आणि प्रेमळपणाचा वास अंतरी दाटतो. तिच्या मुखावरील तेजोवलयाने संपूर्ण वर्षभराची गौराईच्या आतुरतेची प्रतीक्षा संपते.
सौभाग्यवतीच्या हर्षाने गौरीची मुळे घरात गणेशोत्सवाची शोभा वाढवतात. ही गौरीची मुळे हळदीच्या मुळाच्या रूपाने गौरी सणाची आपली परंपरा जपतात. कोकणात विशेषतः हळदीची मुळे पूजा करून घरोघरी आणण्याची प्रथा आजही जोपासली जाते. यासाठी हळदीची दोन मुळे, तांब्या किंवा कळशी घेऊन माहेरवशिणी आणि सासुरवशिणींचा विहिरीवर गोतावळा जमतो.
गौराईला आणण्यासाठी टाळ मृदूंगाचा गजर आणि ताशांची तडतडही लागतेच. हळदीची मुळे कळशी किंवा तांब्यामध्ये घेऊ न माहेरवाशीण माहेरी येऊन गौरीला विराजमान करते. माहेरवाशिणीचं हे रूप सर्वांनाच सद्गदित करते. गौराई जशी सार्यांच्या अंतरी विराजमान होते तितक्याच ऊ र्मीने माहेरी आलेली माहेरवाशीण आपल्या आई वडिलांना, दादा वहिनीला येऊन भेटल्याने अंतरी विलसते.
गौरीला घरात आणण्यासाठी विहिरीवरून तिच्या आगमनाची तयारी केली जाते. प्रथम विहिरी नजीकचे पाच खडे स्वच्छ करून घेतले जातात. तिथे रांगोळी रेखून त्या खड्यांचे पूजन केले जाते. इथे खर्या अर्थाने गौरीच्या आगमनाचे मूळ सापडते, आणि आवाहनाला सुरुवात होते. धूप दीप अगरबत्ती दाखवून खड्यांना हळदीकुंकू वाहिले जाते. त्यानंतर पाण्याने भरलेल्या कळशीमध्ये हळदीची मुळं घालून ती कळशी माहेरवाशिणीच्या डोक्यावर भरून दिली जाते. यावेळी टाळांचा झणत्कार आणि मृदुंगाचा नाद गौरीच्या आगमनाची नांदी देतात. माहेरवाशिणीने न बोलता माहेरीच्या अंगणात यावयाचे असते. तिने तोंडातून चकार शब्द काढायचा नसतो. त्यासाठी तोंडात पाण्याची चूळ भरून घ्यावी लागते.
विहिरीवर गौराईची पूजा झाल्यावर डोक्यावर पाण्याने भरलेली हळदीच्या मुळांची कळशी ही तोंडात चूळ भरूनच माहेरी घेऊ न यावयाची असते. ती आणि तिच्या समवेत असणारा लवाजमा जेव्हा माहेरच्या अंगणी येतो तेव्हा गौरीच्या आगमनाचे चौघडे निनादतात. गौरी अंगणी आल्यावर दरवाजात तिंचं लिंबलोण काढलं जातं. माहेरवाशिणीच्या डोळ्याला पाणी लावून तिचे पाय धुवून दरवाजात तिने भरलेली पाण्याची चूळ थुंकून रांगोळी रेखून गौराईचं खर्या अर्थाने पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू वाहून स्वागत केलं जातं.
गौराई अंगणातून घरात प्रवेशली की, गौरीच्या स्वागताचं पारणं फिटतं. श्री गणरायाच्या शेजारीच गौराईचा पाट मांडला जातो. उत्सवाचा खरा झंकार आणि संस्कार येथे उमटतो. एकीकडे गौराईचं आगमन होतं तर दुसरीकडे स्वयंपाक घरातून गौराईसाठी खास बनवलेल्या सुग्रास जेवणाचा दरवळ घरभर पसरतो. तिच्यासाठी नैवेद्याची रास लागते. गौराईचे यथासांग पूजन केल्यानंतर रात्री गौराईला विविध सुग्रास भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो.
यावेळी भाकरी आणि भाजीचा नैवेद्य असतोच शिवाय गोडधोड पदार्थाचाही बेत खास गौराईसाठी केला जातो. नंतर फुगड्या गाण्याचा नाद घुमतो. तर दुसर्या दिवशी गौरी पूजनाच्या वेळी गौराई नवा साज लेवून वसते. फुलांच्या माळा, सभोवती शृंगारमय वेली, सभामंडपात विराजमान झालेली गौराई सार्यांच्याच अंतरी वसते. तिचं रूप डोळ्यात साठून राहतं. गौरीचा ओवसा भरण्याची प्रथा रूढ आहे. यावेळी सुवासिनी, नवविवाहिता गौरीचा ओवसा भरण्यासाठी रांगा लावतात. खणा नारळाची ओटी, फळांची आरास आणि गौरीच्या आगमनाने फफुल्लित झालेलं वातावरण पाहता एकंदरीतच गणेशोत्सवाची धामधूम अनुभवली जाते.
गौराईची ठिकठिकाणीची परंपरा ही वेगळी आहेे. काही ठिकाणी गणपती आणि गौरी एकत्र पूजन केले जाते तर काही ठिकाणी दोन गौरीच्या मूर्ती प्रतिष्ठापना करून फक्त गौरी पूजन केले जाते. कुणी नवसाच्या गौरी आणून घरी प्रतिष्ठान करतात, तर कुणी गौरी मुखवटे सजवून परंपरेने चालत आलेली पूजा दृढ करतो. गौरीचे लाकडी कलाकुसरीचे मुखवटे कोकणातील कला जोपासताना दिसतात. अलंकाराचा साज ही पौराणिकच. लाकडी, मातीचे, प्लास्टरचे मुखवटे गौरी पूजनास विराजमान केले जातात.
असं नाही की, दरवर्षी नवीन मुखवटे आणूनच पूजा करावी, तर काही घरांमध्ये परंपरागत असलेल्या गौरी आजही जशाच्या तशा जपून ठेवलेल्या दिसून येतात. अलंकाराचा साज ल्यायलेल्या या गौरी जेव्हा अधिक सोन्या-मोत्याच्या दागिन्यांनी मढवल्या जातात तेव्हा त्यांचे सौंदर्य हे विलोभनीय भासते. गौरी जशा वाजत-गाजत येतात, तशाच वाजत-गाजत गणपती बाप्पा सोबत गौरी विसर्जनावेळी निघतात, तेव्हा मात्र मनाचा बांध फुटतो. वर्षभराने घरात आलेल्या गौराईला मानाने निरोप दिला जातो. गणरायासोबतच गौरी विसर्जनाची प्रथा पाहता काही ठिकाणी गौरीचे मुखवटे हे पाण्यात बुडवून पुन्हा घरी आणले जातात. गौरीच्या सणाचा नवा साज यावेळी निरखता येतो. गणेशोत्सवातही धूम कोकणात विशेषत: घरोघरी जोपासली जाते.

