

Does Gatari Party Allowed at Yeoor Hills Thane
ठाणे : येऊर, ठाणे येथील वनपरिसरात गटारीच्या निमित्ताने मद्यधुंद अवस्थेत गर्दी, गोंगाट, अस्वच्छता आणि निसर्गाची हानी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. 23 आणि 24 जुलै रोजी येऊर वनक्षेत्र सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, अशी स्पष्ट सूचना वन विभागाने दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून गटारी निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने येऊरमध्ये गर्दी करत होते. मद्यप्राशन, ध्वनीप्रदूषण, असभ्य वर्तन, जंगलातील नाल्यांमध्ये अंघोळ, प्लास्टिक व काचांचा कचरा यामुळे निसर्गसंपत्ती आणि वन्यजीव धोक्यात येत होते. यामुळेच येऊर वनपरिसरात गटारी साजरी करणे यंदा पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी दिली.
वनविभाग, ठाणे शहर पोलिस, वाहतूक नियंत्रण शाखा, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्तरित्या या दोन दिवसांसाठी नियोजन केले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली विस्तारातील येऊर वनक्षेत्र हे जैवविविधतेने समृद्ध असून येथील बंधारा, नाले आणि डोंगर भाग हे अतिसंवेदनशील आहेत. येथे होणारी गर्दी वन्यजीवांच्या अधिवासाला गंभीर धोका ठरते, असे वनविभागाने नमूद केले आहे.
वनविभागाने आवाहन केले आहे की, गटारी साजरी करण्यासाठी जंगलात येऊ नये. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. वनविकास अधिनियम 1927 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत नियमभंग करणार्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
मयुर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर