

नालासोपारा : पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरणार्या आरोपी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी पुण्याच्या हडपसर येथील म्हाडा परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेतले. हत्येच्या गुन्ह्याचा 24 तासांत छडा लावण्यात यश मिळवले आहे. आरोपींना जवळच्या पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून लवकरच दोघांना पेल्हार पोलिस ठाण्यात घेऊन येणार आहे. आरोपी पत्नीजवळ तिचे लहान बाळही असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
एखाद्या चित्रपटाप्रमाणे हत्येचा गुन्हा करणार्या आरोपींना पकडण्याचे खूप मोठे आव्हान पेल्हार पोलिसांच्यासमोर होते. हत्येच्या आरोपींना पकडण्यासाठी विरार गुन्हे शाखा, मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि पेल्हार पोलिसांच्या टीम आरोपींच्या मागावर होत्या. आता या आरोपींनी विजयची नेमकी हत्या का व कोणत्या कारणामुळे आणि कशाप्रकारे केली याचा उलगडा होणार आहे.
मयत विजय चौहान आणि त्यांची पत्नी आपल्या मुलासह साई वेल्फेअर सोसायटीमध्ये राहत होते. तर विजय चौहान यांचे दोन भाऊ बिलाल पाडा इथे राहतात. त्यांनी एक नवीन घर घेतले होते. त्यामुळे त्यांना पैशांची गरज होती. जुलै महिन्याच्या 10 जुलैला त्यांनी विजय चौहान यांना फोन केला. यावेळी तो स्विच ऑफ लागला. त्यामुळे त्यांनी आपल्या वहिनीला फोन लावला. त्यावेळी वहिनी म्हणजेच आरोपी चमन देवीने सांगितले की विजय हे कामासाठी बाहेर गेले आहेत.
यानंतर विजय यांच्या भावाने वहिनीला पुन्हा 17 जुलैला फोन लावला. यावेळी वहिनीचा फोनदेखील स्विच ऑफ लागला. याबद्दल शहानिशा करण्यासाठी विजय यांचा भाऊ साई वेल्फेअर सोसायटीमधील घरी गेला. घरातून दुर्गंध येवू लागल्याने कुटुंबातील सदस्यांनी विजयच्या घराचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांनी जमीन खोदली तेव्हा विजयचा मृतदेह आढळला. आरोपीने गुन्हा लपविण्यासाठी विजयचा मृतदेह घरात पुरला. हत्येनंतर, महिलेने तिच्या मेहुण्याला मृतदेह लपवण्यासाठी त्या ठिकाणी टाइल्स लावायला लावले जेणेकरून तो कोणाच्याही नजरेत येऊ नये, अशी बाब तपासात पुढे आली आहे.
धानीवबागच्या गांगडीपाडा येथील ओम साई वेल्फेअर सोसायटीत राहणार्या विजय चौहान (34) यांची पत्नी चमन देवी (28) आणि प्रियकर मोनू शर्मा (20) याच्या मदतीने निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह घरातच पुरला होता. धक्कादायक म्हणजे मृतदेह पुरल्यावर त्यावर नवीन टाईल्स देखील लावण्यात आल्या होत्या. हा प्रकार 15 दिवसांनी उघड झाला आहे. विजयचा शोध घेऊनही काही पत्ता लागत नसल्याने शेवटी त्याचा भाऊ अखिलेश चौहान (24) याने रविवारी रात्री पेल्हार पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती.