

डोंबिवली : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणांदरम्यान कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गुन्हेगारीचा सफाया अर्थात समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अरबाज हबीब शेख (२३) या समाजासाठी धोकादायक असलेल्या उपद्रवी गुंडावर एमपीडीए अर्थात झोपडीदादा कायद्यांतर्गत तडीपारीची कारवाई करण्यात आली असून या गुंडाची एक वर्षाकरिता रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
पोलिस ठाण्याच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगार अरबाज शेख हा बदमाश कल्याण पूर्वेकडील खडेगोळवलीच्या अवधराम नगरात राहतो. या गुंडाच्या उपद्व्यापांमुळे परिसरातील रहिवासी, दुकानदार, व्यापारी त्रस्त झाले होते.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणांच्या दरम्यान या गुंडाकडून समाजाला धोका होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या वाढत्या उपद्व्यापांना आळा घालण्याकरिता त्याच्या विरोधात महाराष्ट्राचा झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्षन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस्) वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ (सुधारणा १९९६), (सुधारणा २००९), (सुधारणा २०१५) भारतीय घटनेचे कलम २२ (५) सह सदर कायद्याचे कलम ३ चे पोटकलम (२) अन्वये धोकादायक व्यक्ती म्हणून कोळसेवाडी पोलिसांकडून जिल्ह्याच्या शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे तसा अहवाल सादर करण्यात आला होता.
त्यानुसार पोलिस आयुक्त डुंबरे यांनी त्यांच्या कार्यालयीन आदेश क्रमांक/टीसी/पीडी/एमपीडीए/१३/२०२५ अन्वये २२ ऑगस्ट रोजी एक वर्षाच्या कालावधीकरिता स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशांनुसार अरबाज शेख याला शनिवारी २३ ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन वैद्यकिय तपासणी केल्यानंतर त्याची रात्री उशिरा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता या गुंडाला कारागृहापर्यंत सोडण्यासाठी एक अधिकारी आणि ३ कर्मचाऱ्यांचा ताफा वापरण्यात आला होता.