

बदलापूर (ठाणे) : गणपती हे आराध्य दैवत. श्री गणरायाची स्थापना घरोघरी केली जाते. गणपती बाप्पांच्या आगमनाने देशभरातील भक्तीमय झालेले वातावरण पाहता बदलापुरातही समाजापासून वेगळ्या असलेल्या तृतीयपंथीयांच्या गुरू श्रीदेवीच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांप्रमाणेच श्रीदेवीकडेही गणपतीचा उत्सव हा आनंदाने साजरा केला जात आहे. तृतीयपंथीयांसोबतच आजूबाजूला राहणारे रहिवाशी आणि व्यापारी यांच्यासह मुंबई, ठाणे नवी मुंबईतून तृतीयपंथीय समूदायातील अनेक जण गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.
अवघ्या दहा बाय दहा फुटाच्या खोलीत राहणार्या श्रीदेवी या तृतीय पंथीयाकडे गेल्या अनेक वर्षांपासून गणपतीची स्थापना केली जाते. मुंबई ठाण्यातील बहुतांशी तृतीयपंथीय हे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बदलापूर येथे येतात. घर जरी लहान असले तरी गणपतीला येणार्या पाहुण्यांच्या पाहुणचार करण्यात कोणतीही कमतरता ठेवत नसल्याचे श्रीदेवी आवर्जून सांगते. येणार्या प्रत्येकाला जेवण आणि प्रसाद दिला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री 12 वाजताच गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. तसेच यल्लमा देवीची पूजाही केली जाते. आरतीसाठी आजूबाजूला राहणारी मंडळीही न चूकता दर्शनास हजर असतात. दीड दिवसाच्या गणपती काळात आमच्या बिरादरीतील सगळे जण एकत्र येऊ न एकमेकांना भेटत असल्याने हा उत्सव आमच्यासाठी खूप आनंदाचा असल्याचे श्रीदेवी यांची सहकारी स्वाती यांनी सांगितले.
समाज आमच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहतो. आमच्यातही असुरक्षिततेची भावना आहे. गणपती हाच आमचा रक्षणकर्ता असून आम्ही त्याच्याकडे सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना करतो. गणपतीला दर्शनासाठी येणार्यांना आम्ही आशीर्वाद देतो. अनेक जण आमच्याकडे न विसरता गणपतीच्या पाया पडायला येत असल्याचे श्रीदेवी यांनी सांगतिले. गणपतीचा उत्सव तृतीयपंथीयांच्या घरातही धुमधडाक्यात साजरा करण्यात येत असल्याने व येथील वातावरण देखील भक्तीमय झालेले दिसते.