

डोंबिवली शहर (ठाणे ) : बाप्पा मोरयाच्या गजरात, ढोल-ताशांच्या दणदणाटात आणि पारंपरिक जल्लोषात घरगुती बाप्पाला निरोप देण्यासाठी आज डोंबिवलीकर पुन्हा एकत्र येणार आहेत. डोंबिवलीतील कलारंग प्रतिष्ठानतर्फे राबवल्या जाणाऱ्या 'गणरायाची वारी' या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी (दि.2) गौरी विसर्जनाच्या दिवशी घरगुती गणपतींचा सामूहिक विसर्जन सोहळा रंगणार आहे. या परंपरेचं यंदाचं पाचवं वर्ष आहे.
या मिरवणुकीची सुरुवात संध्याकाळी सहा वाजता फडके रोडवरील मदन ठाकरे चौकातून होईल. त्यानंतर आप्पा दातार चौक मार्गे पुढे सरकत ही मिरवणूक नेहरू मैदानातील कृत्रिम तलावाजवळ विसर्जन सोहळ्याने संपन्न होणार आहे. या उपक्रमातून लोकांनी एकत्र यावं आणि एकत्र विसर्जन करावं हा उद्देश असतो. या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे ढोल, ताशा, ध्वज, झांज अशी विविध पारंपरिक वाद्ये. तसेच प्रेक्षक, यजमान आणि कलारंगचे वादक सारे एकत्र येऊन बाप्पाच्या नावाचा जयघोष करतात. उत्सव सामूहिकरीत्या साजरा केल्यास त्याचा आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कलारंग प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक घरांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह मर्यादित कुटुंबापुरता राहिलेला दिसतो. विसर्जनावेळी घरातील मोजकेच जण सहभागी होत असल्याने, सणाचा सोहळा थोडा कमी भासतो. याला पर्याय म्हणून, ढोल-ताशा वादक मंडळींनी 'गणरायाची वारी' हा उपक्रम सुरू केला. समाजातील सर्वांना एकत्र आणून गणेशोत्सव सामूहिक स्वरूपात साजरा करण्याचा यातून प्रयत्न होत आहे.
बाप्पाचे विसर्जन वाद्यांच्या गजरात आणि गणरायाच्या नामजपानेच व्हायला हवे. मात्र बदलत्या काळात एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची परंपरा कमी होत आहे. सांस्कृतिक नगरीतही या उत्साहाचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही परंपरा जोमाने टिकवण्याची जबाबदारी आता तरुणाईने स्वीकारली असून, हा उपक्रम तरुण मंडळींच्या पुढाकारातून सुरू झाला असून आजही तरुणाई या वारीला उत्साहात पुढे नेत आहे.