

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड दिवसाच्या गणेशोत्सवाची गुरुवारी सांगता झाली. फटाक्यांच्या आतषबाजीत व ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात जिल्ह्यात सुमारे 16 हजार 449 खासगी गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात नदी, समुद्र, तलाव, विहिरी आदी ठिकाणी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
भजन, आरत्यांच्या सुरांनी परिसर भक्तिमय झाला होता. गेले चार दिवस कोसळणार्या संततधार पावसामुळे गणेशभक्तांची काहीसी गैरसोय झाली. मात्र, तरीही मोठ्या उत्साहात भाविकांनी गणेशोत्सवाचा आनंद लुटला. गुरुवारी दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने भाविकांना मोकळेपणाने गणेशमूर्तीचे विसर्जन सुरळीत करता आले. रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता.
बांदा -740 , दोडामार्ग - 560, सावंतवाडी -5473, वेंगुर्ले- 1020, निवती- 387, कुडाळ-446, सिंधुदुर्गनगरी- 238, वैभववाडी-825, कणकवली -3800, विजयदुर्ग- 712, देवगड- 1640, आचरा-290, मालवण-318