

पोलादपूर (ठाणे) : समीर बुटाला
गणेशोत्सव म्हटलं की समोर येतो तो बाल्या डान्स... कोकणात याला जाखडी नृत्य असंही म्हटलं जातं... कोकणची ओळख असलेलं हे जाखडी नृत्य विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात पहायला मिळतं. गणेशोत्सवात कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर जाखडीच्या डबलबारीचे कार्यक्रम रंगतात. मात्र हा प्रकार फक्त सणासुदीचे काळात पाहावयास मिळत असून शासनाच्या सांस्कृतिक विभागाने या पारंपरिक नृत्याला पारंपरिक पद्धतीला अनुदानाचा हातभार लावत ही कला जोपासण्यासाठी योजना आखणे गरजेचे बनले आहे.
कोकणच्या जाखडी नृत्याला एक वैशिष्टपूर्ण असा ठेका आहे. जाखडीला साथ देणारे, गण गवळण गाणारे मध्यभागी एकत्र बसतात आणि वैशिष्टपूर्ण रंगीबेरंगी कपडे घालत जाखडी नृत करणारे त्यांच्या भोवती फेर धरून नाचतात. ढोलकीवर थाप पडताच नृत्याच्या पहिल्या कलावंताची एंट्री होते. दोन वाट्यांवर पाय ठेवून आणि डोक्यावर पेटता दिवा ठेवत हा कलावंत सलामी देतो आणि मग याच जाखडीच्या ठेक्यावर हे जाखडी कलावंत. आकर्षक मानवी मनोर्याच्या सहाय्यानं विविध पक्षी-प्राण्यांचे आकार घेत आपला कलाविष्कार सादर करतात. यानंतर सुरू होते ती गण आणि गवळण... पायाच्या आणि हाताच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली आणि एकमेकांमधील ताळमेळ जाखडीला अधिक आकर्षक बनवतात.
कोकणच्या ग्रामीण भागात जाखडी नृत्याची परंपरा जपणारी घराणी आहेत. त्यांचेही नियम आणि मान ठरलेले आहेत. काळाच्या ओघात कोकणचा हा सांस्कृतीक ठेवा मागे पडतोय. नवी पिढी या लोककलेपासून दूर जातेय काही भागात ही लोककला जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतायत.
गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी आपण कोकणातील कोणत्याही गावात पोहोचलो तर जाखडीचा हा ठेका हमखास कानी पडतो. फेर धरून जाखडी नाचणार्या कलावांतांभोवती अख्खा गाव जमा होवून त्याचा आनंद घेत असतो. निसर्गसौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी नृत्य’. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. हा नाच उभ्याने केला जातो, म्हणून त्यास ‘जाखडी’ असे म्हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो - ‘जखडणे’. ‘जाखडी’मध्ये नृत्य करणार्यांची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्हटले जाते.
मुंबईत ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरून ते करीत असलेल्या नृत्याला, ‘बाल्या नाच’ असे नाव पडले. बाल्या अथवा जाखडी नृत्यास रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी ‘चेऊली नृत्य’ असेही म्हणतात. त्याला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळत आहे.
त्या कला प्रकाराचा उगम शाहिरी काव्य, तमाशा या लोककलां पासून सुरू झाला. त्यात कलगीवाले व तुरेवाले असे दोन पंथ असतात. बाल्या नाचाला कलगीतुरा किंवा शक्ती-तुर्याचा सामना असेही म्हणतात. सहाव्या शतकानंतर होऊन गेलेले कवी नागेश यांनी ‘कलगी’ या पंथाची सुरुवात केली. त्यांच्या नावावरून त्या पंथाला ‘नागेशवळी’ म्हणजेच नागेशाची ओळ किंवा पंथ असेही ओळखले जाऊ लागले. नागेश यांनी कलगी पंथाची स्थापना केल्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला समकालीन कवी हरदास यांनी ‘तुरेवाले’ या पंथाची सुरुवात केली. त्याला हरदासवळी म्हणजेच हरदासाची ओळ किंवा पंथ असेही म्हटले जाऊ लागले. दोन पंथांपैकी एकाने शक्तीचा (पार्वतीचा) मोठेपणा आपल्या कवितेतून किंवा शाहिरीतून मांडला आणि दुसर्याने हराचा (शिवाचा) मोठेपणा सांगितला.
पंथांना ओळखण्याची खूण म्हणून कलगीवाल्यांनी कलगी या चिन्हाचा वापर केला आणि तुरेवाल्यांनी आपल्या डफावर पंचरंगाचा तुरा लावण्याचा प्रघात पाडला. या दोन गटात काव्यात्मक जुगलबंदी रंगते.