Thane BMC Bomb Threat : ठाणे पालिका मुख्यालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी

यंत्रणांची धावपळ, धमकीचा ई-मेल मिळताच संपूर्ण इमारत केली रिकामी
Thane BMC Bomb Threat
Thane BMC Bomb Threatpudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : नवी मुंबईतील बेलापूर न्यायालय आणि नवी मुंबई महापालिकेला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी ठाणे महापालिका मुख्यालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली. या ई-मेलमध्ये काही वेळातच महापालिका मुख्यालय बॉम्बने उडविण्यात येणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाने तातडीने संपूर्ण इमारत रिकामी केली.

पोलीस, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्बशोधक पथक तसेच श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण परिसराची तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

Thane BMC Bomb Threat
Thane Liquor Smuggling : रेतीबंदर परिसरात अवैध मद्यसाठा जप्त; एकाला अटक

पाचपाखाडीतील चंदनवाडी परिसरात ठाणे महापालिकेचे मुख्यालय असून, या ठिकाणी दररोज लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. गुरुवारी बेलापूर न्यायालय आणि नवी मुंबई महापालिकेला धमकीचा ई-मेल मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर काही वेळातच ठाणे महापालिका मुख्यालयालाही धमकीचा संदेश प्राप्त झाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

धमकीच्या ई-मेलची माहिती मिळताच ठाणे पोलिसांसह अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान मुख्यालयात दाखल झाले. कोणताही धोका उद्भवू नये, यासाठी खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत तातडीने खाली करण्यात आली. कार्यालयीन कामकाज सुरू असतानाच अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक व कामानिमित्त आलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. यामुळे काही काळ मुख्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

अर्ध्या तासानंतर बॉम्बशोधक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकांनी मुख्यालयातील विविध विभाग, कार्यालये व परिसराची तपासणी केली. तपासणी पूर्ण होईपर्यंत नागरिकांना मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच थांबविले होते. अखेर संपूर्ण तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

Thane BMC Bomb Threat
Teachers Non Academic Work Ban : शिक्षकांची शालाबाह्य कामांतून सुटका होणार

विशेषत: काही दिवसांपूर्वी ठाणे सत्र न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. त्यावेळीही पोलिसांनी तपासणी केली; मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नव्हती. आता सलग वेगवेगळ्या शासकीय आणि न्यायालयीन आस्थापनांना धमकीचे ई-मेल मिळत असल्याने पोलीस यंत्रणांसमोर या प्रकाराचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

प्रभाग समितीची तपासणी करा : महापौर

ठाणे महापालिका बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या बातमीनंतर पालिका मुख्यालयावर आलेल्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी उपस्थिती दर्शविली. दरम्यान महापौर पिंपळोलकर यांनी पालिका प्रशासनाला पालिका मुख्यालयाप्रमाणेच पालिका प्रभाग समितीच्या कार्यालयाचीही तपासणी करा, मातृकार्यालयातून कर्मचारी आणि नागरिकांना बाहेर न काढता तपासणी करा, असे निर्देश सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिले.

२६ नोव्हेंबर रोजी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला असून, त्यामध्ये २७ नोव्हेंबरला बॉम्ब ठेवण्यात येणार असल्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आलेला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारीच महापालिका मुख्यालयामधील कर्मचारी आणि कार्यालय रिकामे करून आजच संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली. दरम्यान काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.

बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.