

मुंब्रा : जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वे धावतात. काही रेल्वे अतिशय वेगाने प्रवास करतात, तर काहींचा वेग कासवाच्या गतीसारखा असतो. प्रत्येक रेल्वेची स्वतःची अशी वेगळी खासियत आहे. भारतातही रेल्वेचं मोठं जाळं आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क भारतात असून रेल्वेचे मार्गही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कुठे ट्रेन बोगद्यातून जाते, तर कुठे नद्यांवरील पुलांवरून प्रवास करते. मात्र, एक अशी मेट्रोही आहे जी चक्क पाण्यावर तरंगत प्रवास करते.
आजवर अनेक प्रकारच्या रेल्वे आणि मेट्रोमधून प्रवास केला असेल. पण कधी पाण्यावर धावणाऱ्या मेट्रोमधून प्रवास केला आहे का? बहुतांश लोकांचं उत्तर नाही असंच असेल. कदाचित काही जणांनी या मेट्रोमधून प्रवासही केला असेल. पण केरळमधील कोची शहरात ही पाण्यावर तरंगत ही अनोखी मेट्रो धावते.
दिल्ली, कोलकाता यांसारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये ही मेट्रो सेवा सुरू आहे. हळूहळू मेट्रोचे जाळेही विस्तारत आहे. मात्र, कोचीमध्ये चक्क वॉटर मेट्रो धावते. या मेट्रोमुळे प्रवाशांना अनेक सुविधा मिळतात.
कोची येथील वॉटर मेट्रो ही भारतातील पहिली वॉटर मेट्रो आहे. २६ एप्रिल २०२३ रोजी ही मेट्रो सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. कोची वॉटर मेट्रो सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांसोबतच पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या वॉटर मेट्रो सेवेमध्ये एकूण ३८ मेट्रो स्थानके आहेत.
ही सेवा दररोज सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असते. या वॉटर मेट्रोमधून एकाच वेळी ५० ते १०० प्रवासी प्रवास करू शकतात. या मेट्रोचे किमान तिकीट २० रुपये, तर कमाल तिकीट ४० रुपये आहे. विशेष म्हणजे ही वॉटर मेट्रो अवघ्या १५ मिनिटांत चार्ज होते.
विशेष म्हणजे, आशियातील ही एकमेव वॉटर मेट्रो असल्याचा दावा केला जातो. या मेट्रोच्या एका बोटीची किंमत सुमारे ७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या मेट्रोमध्ये हिंदी, इंग्रजी आणि मल्याळम् या तीन भाषांमध्ये माहिती दिली जाते.
निसर्गरम्य दृश्यांचा घेता येतो आनंद...
या मेट्रोची लांबी २४ मीटर असून, एकावेळी या मेट्रोतून सुमारे १०० प्रवासी आरामात प्रवास करू शकतात. या वॉटर मेट्रो नेटवर्कमध्ये एक-दोन नव्हे, तर एकूण ७८ इलेक्ट्रिक बोटी आहेत. या बोटी पाण्यावरून जात असतानाही विजेवरच चालतात. या वॉटर मेट्रोमध्ये प्रवाशांसाठी चार्जिंग पॉइंट, मोफत वाय-फाय, लाइफ जॅकेट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध आहे. एवढंच नाही, तर मेट्रोमधील आसनावर बसून प्रवाशांना कोचीमधील सुंदर निसर्गरम्य दृश्यांचाही आनंद घेता येतो.