नेवाळी : ठाणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत असलेल्या 14 गावाचा अखेर नवी मुंबई मनपात समावेश झाला आहे. नवी मुंबई मनपा आयुक्तांनी या संदर्भात कार्यकारी अभियंता मदन वाकचौरे यांच्याकडे 14 गावांचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पाच ग्रामपंचायतीकडून कार्यभार आपल्याकडे हस्तांतर करण्यास नवी मुंबई मनपाने सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी गेले अनेक वर्षे तेथील ग्रामस्थ करत होते. यासाठी त्यांनी सहा वेळा ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच ही गावं नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्याकरिता आमदार राजू पाटील आणि 14 गावं सर्वपक्षीय विकास समिती पाठपुरावा करत होती. मात्र कोरोना काळात हा विषय मागे पडला पण कोरोना कालखंडानंतर आमदार पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा मांडला होता. यावेळी तात्कालीन पालकमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. मात्र घोषणा झाल्यानंतर हा विषय अडकून राहिला होता.
हीच बाब लक्षात आल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी 20 ऑगस्ट 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आणि अर्थसंकल्पिय अधिवेशनात लक्षवेधीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राची तातडीने दखल घेतली आणि सप्टेंबर 2022 रोजी या बाबतचा जीआर काढला आहे. त्यामुळे ही गावं आता नवी मुंबई पालिकेत समाविष्ट होणार आहेत, असे सांगितले होते.
यानंतरही मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपूरवा चालूच ठेवला. मात्र प्रशासन तांत्रिक मुद्दे काढत असल्याने हा विषय लांबणीवर जात होता अखेर मार्च 2024 ला ठाणे जिल्ह्यात झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा देखील केली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे खा. डॉ.श्रीकांत शिंदे, 14 गावे विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, यांसह 14 गावं विकास समितीची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 14 गावं नवी मुंबईत समाविष्ट करण्याची अंतिम अधिसूचना शासनाकडून जाहीर करण्यात आली होती.
नवीमुंबई पालिकेच्या एका अभियंत्याला मुळ विभागाचे कामं संभाळून अतिरिक्त कामकाज (14 गावांचे) पहावयाचे आदेश नवीमुंबई पालिकेच्या आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आदेश काढले आहेत. दरम्यान 14 गावांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामाला 11 जुलैपासून कामाला सुरवात करणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली आहेत. त्यामुळे 14 गावांचा नवी मुंबई मनपा प्रवेशाचा वनवास आता संपला आहे.
याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं की नवी मुंबई महानगरपालिकेत प्रवेशासाठी कल्याण ग्रामीणमतदार संघातील 14 गावांनी ग्रामपंचायत निवडणुकांवर सहा वेळा बहिष्कार टाकला होता. मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर 14 गाव विकास समितीला सोबत घेऊन अनेक वेळा पाठपुरावा करून अधिवेशनात प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 गावं नवी मुंबई मनपात समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणी येत असल्याने शासनाची अधिसूचना निघाली नव्हती. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर आज शासनाने 14 गाव नवी मुंबईत समाविष्ट करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 14 गावांच्या एकजुटीचा खर्या अर्थाने आज विजय झाला आहे. मी 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीचे, नागरिकांचे अभिनंदन आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असं देखील आमदार राजू पाटील यांनी सांगितलं आहे.