

रायगड : राज्यातील मत्स्योत्पादनात 29 हजार 184 टन वाढ झाली आहे. सन 2023-24 मध्ये राज्याचे 4 लाख 34 हजार 575 टन होते, 2024-25 मध्ये ते वाढून 4 लाख 63 हजार 758 टनवर पोहोचले आहे. गेल्या मासेमारी हंगामात मत्स्योत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले होती. मात्र हंगामात मत्स्योत्पादनात पुन्हा वाढ झाल्याने मत्स्यव्यावसायायिकांना दिलासा मिळाला.
गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच सर्वाधिक मत्स्योत्पादनाची नोंद या वर्षी झाली आहे. परप्रांतीय मासेमारी बोटींना राज्याच्या सागरी हद्दीत होणारी घुसखोरी रोखण्यात आलेले यश, पर्ससीन आणि एलईडी मासेमारी रोखण्यात यश, अवैध मासेमारीवर ड्रोनने लक्ष ठेवले जात आहे, याचा परिणाम अवैध मासेमारी कमी होण्यावर झाला आहडे. तसेच हवामानाने दिलेली साथ मच्छीमारांच्या पथ्यावर पडली आहे. राज्यातील मत्स्य उत्पादन वाढीचे प्रमाण 6.29 टक्के आहे. महत्वाची बाब म्हणजे कोकण किनारपट्टीवरील इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोकणातील मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.
2023-34 मध्ये ठाणे जिल्ह्यात 26 हजार 057 टन उत्पादन नोंदवले गेले होते. त्या तुलनेत 2024-25 मध्ये ठाण्यात 54 हजार 457 टन मत्स्य उत्पादन झाले आहे. तर पालघर, मुंबई उपनगर, बृहमुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मत्स्योत्पादन साधारणपणे मागील हंगामाच्या तुलनेत 1 ते 2 हजार टनची वाढ झाली आहे.
पालघर - 31 हजार 181 टन
ठाणे - 54 हजार 457 टन
मुंबई उपनगर - 75 हजार 254 टन
बृहमुंबई - 1 लाख 73 हजार 091 टन
रायगड - 35 हजार 027 टन
रत्नागिरी - 71 हजार 303 टन
सिंधुदुर्ग - 23 हजार 445 टन
गेल्या काही वर्षात राज्यातील मच्छीमारांना विवीध प्रकाराच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले होते. करोना काळातील टाळेबंदीमुळे मत्स्य व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यानंतर निसर्ग आणि तौक्ते वादळांचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसला होता. गेल्या हंगामातली हवामानातील बदलांचा फटका मासेमारी बसलो होता. मात्र यावर्षीचा हंगात हवामानाची साथ मिळाल्याने मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला. मत्स्य उत्पादन घटण्यामागे प्रामुख्याने नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणे आहेत. नैसर्गिक कारणामध्ये हवामानात होणारे बदल, किनारपट्टीवर येणारी वादळे आणि प्रदूषण या घटकांचा समावेश आहे. तर परप्रांतीय नौकांकडून राज्याच्या सागरी हद्दीत केली जाणारी मासेमारी, एलईडी दिव्यांच्या साह्याने पर्ससीन नेटचा वापर करून मासेमारी या कारणांमुळे मासेमारीवर परिणाम होतो.