

पणजी : मासेमारी बंदी असली तरी वेगवेगळया प्रकारचे मासे पणजी मासळी बाजारात मिळत आहेत. रविवारी पापलेट विक्रीसाठी आली होती आणि त्यांचे दरही सर्वसामान्यांना परवडणारे होते. मध्यम आकाराच्या पापलेटची जोडी चक्क 300 रुपयांना मिळत होते. थोडी कुणी घासाघीस केली असती तर 500 रुपयांना 4 सुद्धा मिळाली असती. विशेष म्हणजे ताजे फडफडीत बांगडेसुद्धा आले होते. मोठे बांगडे 300-400 रुपये, तर मध्यम बांगडे 200-300 रुपये किलो मिळत होते. खाडीतील मासेही उपलब्ध होते.
कोकारी, शेतके, काळुंद्रा असे ताजे मिक्स मासे 600 रुपये किलो होते. यांचा आकारही मोठा होता. तिसरे, खुबे, प्रॉन्स मोठ्या प्रमाणात आले होते. मोठ्या प्रॉन्सचा वाटा 200 रुपयांना मिळत होता. 300,400,500 रुपये किलो दराने प्रॉन्स विकले जात होते. बांगडे 200 रुपयांना 6 ते 7 बांगडे वाट्यात मिळत होते. वेर्ले, लेप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. आकाराने मोठा सरंगा 500 ते 600 रुपयांना मिळत होता. मोठे खुबे 300 ते 400 रुपये शंभर,तर तिसरे 500 रुपये 100 असा दर होता. मोठे शेंगट मासे 100 रुपयांना 6 मिळत होते.
पणजीपेक्षा म्हापसा मासळी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ताजे मासे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बहुतेक मासे विक्रेते शिरोडा, वेंगुर्ले,मालवण या लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येतात.त्यांच्याकडचे मासे रापणीचे आणि ताजे असतात. त्यामुळे खवय्यांची गर्दी अधिक असते. सिंधुदुर्गातील स्थानिक मासेविक्रते स्वतः येत असल्याने दरही जास्त नसतो. त्यामुळे मासे खरेदीसाठी गर्दी होते.