Kalyan Dombivli Potholes: पहिल्याच पावसात कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांची दैना

रस्ते दुरुस्तीवर केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात; अधिकाऱ्यांसह ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
Kalyan Dombivli Potholes
Kalyan Dombivli PotholesPudhari
Published on
Updated on

योगेश गोडे

सापाड: कल्याण-डोंबिवलीत पहिल्याच पावसाने रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता उघडकीस आणली आहे. शहरातील अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

रस्ते बांधणी आणि दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असले तरी पहिल्याच पावसात रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता हा निधी नेमका कुठे खर्च झाला, असा प्रश्न कल्याणकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Kalyan Dombivli Potholes
Bhiwandi Food Safety Action: भिवंडी पालिका अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध राबविणार धडक मोहीम

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील रस्ते बांधणीसाठी सर्वच प्रभागात स्पर्धा सुरू असताना काही ठिकाणी काँक्रीटीकरण आणि काही ठिकाणी डांबरी कारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर काही रस्त्यांवर दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, पावसाच्या पहिल्याच सरींनी या कामांची गुणवत्ता तपासली आणि अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याचे चित्र समोर आले.

त्यामुळे पालिकेच्या कार्यपद्धतीसह संबंधित ठेकेदारांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रामुख्याने कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून कल्याण मार्गे सापाड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

तसेच कल्याण शहरातील बिर्ला कॉलेज रोडवरील अंतर्गत रस्ते, खडकपाडा परिसर, शहाड रोड, वालधुनी परिसर, आधारवाडी रोड, गोवेली रोड, टिटवाळा मार्ग, मुरबाड रोड तसेच विविध अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचा वरचा डांबरी थर निघून गेला असून खडी उघडी पडली आहे.

काही भागांत तर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या प्रमुख मार्गांवर खड्ड्यांमुळे वाहतूक संथ झाली आहे.

दुचाकीस्वारांना विशेषतः मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे केली जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो.

मात्र, पाऊस सुरू होताच रस्ते पुन्हा खराब होतात. त्यामुळे रस्त्यांच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप कल्याणकर नागरिकांकडून केला जात आहे. "करदात्यांच्या पैशातून रस्ते बांधले जातात.

Kalyan Dombivli Potholes
Live Streaming Controversy: वसई-विरार महापालिकेत महापौरांची दंडेलशाही?

पण प्रत्येक वर्षी तेच चित्र दिसते. रस्ते बनतात आणि काही महिन्यांतच उखडतात. याची चौकशी झाली पाहिजे. तर रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत हेच कळत नाही. वाहनांची देखभाल करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

महानगरपालिका दरवर्षी रस्ते बांधणी, काँक्रीटीकरण डांबरीकरण आणि दुरुस्तीच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. विकासकामांच्या नावाखाली विविध रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येते. मात्र, पहिल्याच पावसात रस्त्यांची झालेली अवस्था पाहता या कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

रस्ते बांधणी करताना दर्जेदार साहित्य, योग्य जाडीचा डांबरी थर, जलनिस्सारण व्यवस्था आणि तांत्रिक निकषांचे पालन आवश्यक असते. या निकषांकडे दुर्लक्ष झाल्यास रस्ते कमी कालावधीत खराब होतात. कल्याणमध्ये दिसत असलेली परिस्थिती याच प्रकारच्या त्रुटींचे उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

रस्ते बांधणीची कामे खासगी ठेकेदारांमार्फत केली जातात. त्यामुळे या कामांमध्ये गुणवत्ता नियंत्रण कितपत केले जाते, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक नागरिकांनी ठेकेदारांवर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्याचा आरोप केला आहे. रस्त्यांच्या कामांनंतर स्वतंत्र गुणवत्ता तपासणी केली गेली पाहिजे. तसेच दोषी ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची गरज आहे. अन्यथा प्रत्येक वर्षी नागरिकांना याच समस्यांना सामोरे जावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news