डोंबिवलीतील इंडो अमाईन्स कंपनीला आग; कंपन्यांचे मोठे नुकसान

डोंबिवलीतील इंडो अमाईन्स कंपनीला आग; कंपन्यांचे मोठे नुकसान

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत दि. 23 मे रोजी झालेल्या रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोटाची दुर्घटना ताजी असतानाच याच फेज दोनमधील इंडो अमाईन्स केमिकल कंपनीत आज (दि.12) सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागली. आग लागताच इंडो अमाईन्स कंपनीसह लगतच्या माल्दे कपॅसिटर्स कंपनीमधील कामगारांनी तात्काळ पळ काढल्याने मोठी जीवित हानी टळली. मात्र या दुर्घटनेत दोन्ही कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या महिन्यात एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटाने डोंबिवली परिसर हादरला होता. या स्फोटात 16 कामगार मृत्युमुखी पडले होते. स्फोटाने डोंबिवलीतील रहिवाशांसह उद्योजकअद्याप सावरले नसताना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीतील कार्यालये सुरू होत असतानाच इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीतील ज्वलनशील वस्तुंना आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.

इंडो अमाईन्स कंपनीत शेतीविषयक उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांनी भरलेले पिंप आगीच्या भक्ष्यस्थानी पडताच कंपनीत स्फोटांची मालिका सुरू झाली. सुरूवातीला कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण करताच कर्मचाऱ्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

इंडो अमाईन्समधील कंपनीच्या ज्वाला जवळच असलेल्या माल्दे कॅपीसिटर्स कंपनीत पोहोचल्या. या कंपनीतील जवळपास अठरा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कंपनीतून बाहेर पळ काढला. या कंपनीत मीटरला लावणारे कपॅसिटर्स तयार केले जातात. वीज वाहक तारांचे गठ्ठे या कंपनीत आवारात होते. या कंपनीत ज्वलनशील वस्तू असल्यामुळे माल्दे कपॅसिटर्स कंपनीने पेट घेतला. या कंपनीतील प्लासिटने पेट घेताच काळ्या धुराचे लोळ आकाशाच्या दिशेने जात होते.

घटनेची माहिती सुरूवातीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे तीन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचे फवारे मारून परिसरातील कंपन्यांमध्ये आग पसरणार नाही याची काळजी घेतली. आगीच्या ज्वाळांवर फोमयुक्त पाण्याचे फवारे मारून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने आणखी आठ अग्निशमन बंब बोलविण्यात आले. पाण्याच मारा करूनही आगा आटोक्यात येत नसल्याचे पाहून सुरूवातीला आजुबाजुच्या कंपन्यांच्या मालकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. शिवाय परिसरातील नागरिक वस्त्यांमध्ये घबराट पसरली होती.

सततचा पाण्याचा मारा करून अग्निशमन जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापनांनी कंपनीत कुणीही कामगार नसल्याची खात्रीशीर माहिती आपत्कालीन यंत्रणांना दिली होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे एवढेच लक्ष्य आपत्कालीन यंत्रणांनी ठेवले होते. तेथूनच महानगर गॅस कंपनीची गॅस वाहिनी जाते. सुदैवाने या गॅस वाहिनीला आगीची जळ पोहोचली नाही. अन्यथा हाहाकार उडाला असता. इंडो अमाईन्स आणि माल्दे कंपनीचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. इंडो अमाईन्स कंपनीत अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून उत्पादन घेतले जाते. तरीही या कंपनीला आग कशी आग लागली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

धोकादायक कंपन्यांच्या स्थलांतराचा विषय बारगळला

अमुदान कंपनीमध्ये शक्तिशाली स्फोट होऊन 12 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 68 हून अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर डोंबिवली एमआयडीसीतील 30 धोकादायक कंपन्या सरकारने स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय धोकादायक कंपन्या बंद केल्याची माहिती दिली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

आसपासचा परिसर तात्काळ निर्मनुष्य

इंडो अमाईन्स कंपनीला आग लागताच पोलिसांनी या कंपनीच्या परिसरातील रहिवाशांना घराबाहेर पडण्याच्या सूचना केल्या. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या कंपनी जवळील अभिनव शाळेतील विद्यार्थी सुरक्षितपणे शाळेबाहेर काढून शाळेला सुट्टी देण्यात आली. कंपनीच्या परिसरात पार्क केलेल्या बस, रिक्षा, दुचाक्या आगीत खाक झाल्या. यामधील काही वाहने कंपनीच्या कर्मचाऱ्यांची असण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

दुर्घटनांमुळे उद्योजक अस्वस्थ

अमुदान कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर राज्य शासनाने डोंबिवली एमआयडीसीतील 30 धोकादायक कंपन्या बंद केल्या. या प्रकाराने उद्योजक अस्वस्थ झाले असतानाच आता पुन्हा एमआयडीसीत रासायनिक स्फोट झाल्याने कंपनी चालकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात यश

इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट होऊन कंपनीला आग लागली. या आगीची झळ जवळच्या माल्दे कपॅसिटर्स कंपनीला लागली. सुदैवाने या दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी नव्हते. त्यामुळे जीवित हानी टळली आहे. मात्र वित्तहानी झाली आहे. या कंपन्यांच्या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन जवानांना यश आले असल्याचे कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचीन गुंजाळ यांनी सांगितले.

चौकशीतून समजणार आगीचे कारण

दोन्ही कंपन्यांना लागलेली आग नियंत्रणात आणली आहे. आग कशामुळे लागली हे तपासानंतर स्पष्ट होईल. तांत्रिक कारणामुळे आग लागल्याची शक्यता आहे. आगीचे कारण चौकशीतून स्पष्ट होईल, असे अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले.

तात्काळ बाहेर पडलो म्हणून बचावलो

बाजुच्या कंपनीत स्फोट झाल्यानंतर आम्ही सर्व कामगार तात्काळ बाहेर पळ काढला. तोपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले. इंडो अमाईन्स कंपनीला आग लागताच लगतच्या माल्दे कपॅसिटर्स कंपनीलाही आगीने गिळंकृत केल्याचे कामगार राकेश लाला यांनी सांगितले.

कंपन्यांतील 3 गॅस सिलेंडर्स स्फोट

आग लागलेल्या घटनास्थळापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत छोटे स्फोट होऊ लागल्यामुळे पोलिसांनी या भागातील सर्व वाहने तेथून सुरक्षितस्थळी हलवली. परिमंडळ – 2 चे उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केडीएमसीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मदतकार्य सुरू केले. समोरील कंपनीची भिंत पाडल्यामुळे आग बऱ्यापैकी आटोक्यात आणता आली. आग लागताच कंपन्यांमध्ये असलेल्या गॅसच्या 3 सिलेंडर्स स्फोट झाल्याचे केडीएमसीच्या 10/ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news