

उल्हासनगर: सिंधी समाजाचे आराध्य देव भगवान श्री झूलेलाल यांच्या वर आपत्तीजनक टिपणी करणाऱ्या अमित बघेल याच्याविरोधात उल्हासनगरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. उल्हासनगर मधील सिंधी समाज आक्रमक झाल्यामुळे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या आदेशाने उल्हासनगर पोलीस ठाण्यात काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष हितेश सेचवानी यांची बघेल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्तीसगड मधील रायपूर येथील के.एस.जे.पी. राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी समाज माध्यमांवर सिंधी समाज आणि त्यांच्या देवतांबद्द्ल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे सिंधी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या निषेधार्थ राजू जग्यासी फ्रेंड सर्कल, झुलेलाल मण्डली, चेटीचंद महायात्रा समिती, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, आमदार कुमार आयलानी, सुलभा गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन देऊन बघेल यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी आक्रमक झालेल्या सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी इशारा दिला की, जर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही तर उल्हासनगर बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल.
समाजाच्या नेत्यांनी सांगितले की, आपल्या इष्टदेवतेबद्दल अपमानकारक वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. अमित बघेल यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.परिस्थितीचा विचार करून पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी उल्हासनगर पोलिसांना तत्काळ या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेशा दिले होते. त्यानुसार अमित बघेल विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.