बदलापूर : पुढारी वृत्तसेवा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या कुळगांव बदलापूर नगर परिषद हद्दीतील मतदान केंद्र क्रमांक 73 श्री जी सेंटर कात्रप येथे मतदान केंद्र सकाळपासून सुरू झाले नव्हते. त्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. एका इमारतीच्या तळाशी मतदान केंद्र उभारून हे मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. अपुरी लाईट व्यवस्था, जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने आणि त्यातच मतदान यंत्र सुरूच न झाल्याने मतदारांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
मतदान केंद्रांतील अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तब्बल 52 मिनिटे हे मतदान केंद्र बंद होते. तोपर्यंत या मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेल्या मतदारांना पिण्याच्या पाण्याची व लाईट आणि पंख्याची ह व्यवस्था निवडणूक आयोगाकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे मतदारांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
सकाळच्या पहिल्या टप्प्यात खासगी कंपनीत काम करणारे अनेक कर्मचारी हे सात वाजण्याच्या आधीपासूनच या मतदानाच्या रांगेत उभे होते. आपल्याला लवकरात लवकर मतदान करून कामावर पोहोचायचे असल्याने सकाळपासून रांगेत उभे असल्याचे मतदारांनी सांगितले. मात्र निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराचा फटका मतदारांना सहन करावा लागला. ईव्हीएम मशीनच्या बॅटरीमध्ये बिघाड झाल्याचे झोनल ऑफिसर यांनी सांगितले. मात्र तोपर्यंत तब्बल पाऊण तासाहून अधिक काळ हे मतदान केंद्र बंद पडले होते. मतदान केंद्राभोवती आणि आत मध्ये असलेला अंधार तसेच लाईटीची अपुरी व्यवस्था यामुळे या मतदान केंद्रावर मोठा घोळ सकाळपासूनच निर्माण झाला आहे.
हेही वाचा :