‌‘प‌’ पर्यावरणाचा...

कृत्रिम पर्यावरण मानवी जीवनाला पूरक असेच तयार करणे आवश्यक
Nature and human responsibility
‌‘प‌’ पर्यावरणाचा...pudhari photo
Published on
Updated on

नूतन बांदेकर

निसर्ग, पर्यावरण हे स्वयंभू आहे तर मानव परावलंबी आहे, म्हणूनच माणसाला या भूतलावर सुखाने जगायचे असेल तर त्याने पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्याला जपणे, संवर्धित करणे, इजा न करणे हे मानवजातीचे आद्यकर्तव्य आहे. तसेच कृत्रिम पर्यावरण मानवी जीवनाला पूरक असेच तयार करणे आवश्यक आहे. तिथे कोणतीही तडजोड केली तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच म्हणजे अखंड मानवाला भोगावे लागणार आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

आमच्या लहानपणी मुळाक्षरे गिरवताना ‌‘प‌’ पतंगाचा अशी ‌‘प‌’ ची ओळख अंकलिपीने करून दिली होती. कालांतराने पतंगाचा ‌‘प‌’ विस्तारत गेला. जगण्याच्या प्रवासात नवनवीन संदर्भ सापडत राहिले. शिक्षण, नोकरी व्यवसाय, संसार, कुटुंब, घर, ऑफिस, मनोरंजन, राजकारण, समाजकारण सगळ्या गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून येत गेल्या. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या बरोबरीने इतर अनेक गोष्टींची भूल चढत गेली आणि गरजा वाढत गेल्या. आम्ही त्यात इतके गुंतत गेलो की, आज तेच खरं जगणं असल्याचा समज दृढ होत आहे.

Nature and human responsibility
माऊली

खरं तर आपल्या अवतीभवतीचे वातावरण आणि घडणाऱ्या घटना आपण जन्मापासून अनुभवत असतो. आपल्या जगण्याचा एक भाग म्हणून आपण त्याकडे पाहतो. नकळत त्याची इतकी सवय होते की, त्याचा विचार करण्याचीही गरज आपल्याला वाटत नाही. नैसर्गिक घडामोडींसोबतच अनेकदा मानवनिर्मित घटना देखील आपल्या जगण्यावर परिणाम करत असतात. किंबहुना निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित गोष्टींमधील सीमारेषा धुरकट झालेली दिसून येते. एक मात्र खरं आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घडामोडींचा बरा किंवा वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतोच असतो.

पर्यावरण म्हणजे सजीवांच्या सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती, ज्यामध्ये हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांसारखे जैविक आणि अजैविक घटक एकमेकांशी आंतरक्रिया करतात. आपल्या सभोवतालचा जो परिसर आहे, तो जीवनास आवश्यक आधार देतो आणि निसर्गाचा समतोल राखतो. त्यामधील जैविक घटक मानव, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव हे आहेत, तर अजैविक घटक जमीन (शिलावरण), पाणी (जलावरण), हवा (वातावरण), सूर्यप्रकाश हे आहेत. म्हणूनच पर्यावरणाची व्याख्या म्हणजे “आपल्या अवतीभवती असलेल्या सजीव (जैविक) आणि निर्जीव (अजैविक) गोष्टींचे मिश्रण म्हणजे पर्यावरण!”अशी आहे.

पर्यावरण मानवी जीवनासह सर्व सजीवांसाठी हवा, पाणी आणि अन्नाचा मुख्य स्रोत आहे. ते निसर्गातील परिसंस्थेचा समतोल राखते. पर्यावरणाचे मुख्य दोन प्रकार आहेत, त्यापैकी एक नैसर्गिक म्हणजे निसर्गाकडून मिळालेले आणि दुसरे म्हणजे मानवनिर्मित मानवाने तयार केलेले पर्यावरण. खरं तर पर्यावरण हेच आपल्या अस्तित्वाचा पाया आहे, आपले जगणे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.

निसर्ग, पर्यावरण हे स्वयंभू आहे तर मानव परावलंबी आहे, म्हणूनच माणसाला या भूतलावर सुखाने जगायचे असेल तर त्याने पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्याला जपणे, संवर्धित करणे, इजा न करणे हे मानवजातीचे आद्यकर्तव्य आहे. तसेच कृत्रिम पर्यावरण मानवी जीवनाला पूरक असेच तयार करणे आवश्यक आहे. तिथे कोणतीही तडजोड केली तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच म्हणजे अखंड मानवाला भोगावे लागणार आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

Nature and human responsibility
Traffic rules awareness : वाहतूक नियमांची प्रत्येकाने सवय लावून घ्यावी

पर्यावरण हे एक गुंतागुंतीचे शास्त्र आहे. त्यातील अनेक घटकांपैकी एक घटक म्हणजे माणूस होय. इतर प्राणी, पक्षी, झाडे, वेली, पाणी, हवा हे कधीतरी निसर्गाच्या नियमांच्या बाहेर जाऊन स्वतःच्या फायद्यासाठी इतर घटकांचा ऱ्हास करताना दिसतात का? फक्त आणि फक्त मानव स्वतःच्या सुखासाठी निसर्गनियमांचे पालन न करता त्यांची मोडतोड करून त्याचे चक्र बिघडवत असतो. हे सातत्याने घडत राहाते आणि मग निसर्ग एखाद्या क्षणाला त्याला त्याची जागा दाखवतो. पर्यावरण संवर्धन म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्यातील सुरेख समन्वय, सुरेख मैत्री होय. निसर्ग दहा हातांनी भरभरून देत असतो, तर माणूस त्यापलीकडे जाऊन निसर्गाला ओरबाडून स्वतः समृद्ध होऊ पाहातो. मग त्यांच्यातली मैत्री कशी टिकेल?

निसर्ग आपला मित्र! हे सुवचन केवळ शाळेत फळ्यावर लिहिले जाते, मुलांकडून वाचून घेतले जाते, पण ते शिकणे राहून जाते. शिकून सवरून मोठे झाल्यावर लक्षात येते की, जगण्यात उतरणे तर दूरच; परंतु पर्यावरणाच्या ‌‘प‌’ ची ओळख देखील झालेली नसते. पर्यावरणाचा विचार करणाऱ्यांची, त्याविषयी बोलणाऱ्यांची, पर्यावरणपूरक जीवन जगणाऱ्यांची संख्या तर नगण्य दिसून येते. शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाचे स्थानही नगण्य आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. इतर विषयांच्या तुलनेत पर्यावरण विषय कुणाच्या खिजगणतीतही नाही, कारण त्याची शंभर गुणांची परीक्षाच नाही. शिक्षक, विद्यार्थी, पालक सगळ्यांनाच अतिरिक्त वाटणारा विषय म्हणजे पर्यावरण! तो जीवनावश्यक असूनही त्याची ओळख देखील नसणे, ही तर खरी शोकांतिका आहे. मग पुढची पिढी केवळ आत्मकेंद्रित होत आहे, असा नाराजीचा सूर काढण्यावाचून आपल्या हाती काही उरत नाही.

त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पुढच्या पिढीला जगण्यासाठी आवश्यक पर्यावरण तरी आपण शिल्लक ठेवतो आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. त्याचे उत्तर नाही असेच आहे. तर मग अजूनही वेळ गेलेली नाही, आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न नक्की करायला हवा, त्यासाठी पर्यावरणाच्या ‌‘प‌’ पासून शिकावे लागले तरी चालेल. मंडळी, दैनंदिन जीवनातील पर्यावरणाचा विचार करूयात. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी देखील नव्याने समजून घेऊयात. जगणं पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न करूयात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news