

ठाणे : दिलीप शिंदे
राज्यासह देशभरात मत चोरी तसेच दुबार, बोगस मतदारांबाबत विरोधी पक्षांकडून सातत्याने आरोपांचा धुरळा उडविला जात असताना आता 18 - 19 वर्ष पूर्ण झालेल्या नव मतदारांची नोंदणीच बंद करण्यात आलेली आहे. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविद्यालयांमध्ये विशेष मोहिम राबवून लाखो तरुणांचे मतदार नोंदणीचे भरून घेतलेले अर्ज गेल्या वर्षांपासून निवडणूक कार्यालयात धूळ खात पडले आहेत. त्यामुळे ठाण्यासह राज्यातील लाखो नव मतदार हे मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी 9 कोटी 59 लाख मतदार नोंदणीची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली. त्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 19 लाख 48 हजार नव मतदारांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तसे घडलेले दिसून येत नसल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. कारण 18 वर्ष पूर्ण झालेल्यांची प्रत्यक्षात मतदार नोंदणी कागदावरच राहिल्याचे दिसून येते.
निवडणूक आयोगाने 18 वर्ष पूर्ण होण्यास सहा महिने शिल्लक असलेल्या नव मतदारांची नोंदणी अर्ज भरून घेतले मात्र 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांची नोंदणी झालीच नाही. विधानसभा निवडणूक संपताच मतदार नोंदणीच बंद करण्यात आली. 18 आणि 19 वर्षावरील तरुणांना आता मतदार बनवून घेण्यास निवडणूक आयोगाकडून नकार दिला जात आहे.
एवढेच नाही तर सप्टेंबर 2024 मध्ये सर्वकागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरलेले असतानाही आजपर्यंत त्या तरुण- तरुणींना मतदार बनविण्यात आलेले नाही. अशा अर्जदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. एकट्या ठाणे जिल्ह्यात हजारो अर्ज प्रलंबित आहेत. राज्यासह देशभरात गाजत असलेल्या मतचोरीच्या आरोपामुळे नव मतदार नोंदणी करण्यास निवडणूक आयोगाकडून तर खोटा घातला जात नाही ना ? अशी चर्चा रंगू लागली आहे.
याबाबत ठाणे जिल्ह्याच्या उप निवडणूक अधिकारी वैशाली माने यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, मतदार नोंदणीच्या वेब साईटवर ऑक्टोबर 2006 मधील जन्मलेल्या सर्व अर्जदारांची नोंदणी होत नाही. यासंदर्भात आलेल्या तक्रारी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठविलेल्या आहेत. त्यांच्या निर्णयानंतर नव मतदार नोंदणीची पुढील प्रक्रिया सुरु होऊ शकते.