

ठाणे : लाडकी बहीण योजना कदापी बंद होणार नाहीत. तर टप्प्या- टप्प्याने यामध्ये वाढ होईल, विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी टप्प्याटप्याने पूर्ण करणार आहे. विरोधकांचा तुम्ही सुफडा साफ केला. सर्व मागण्या गोरगरिबांच्या आहेत. सरकार आणि तुम्ही वेगळे नाहीत, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे काम करावे, असे आवाहन सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना केले.
हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा संदेश असल्याची तयारी चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगू लागली आहे. निमित्त होते नाशिकमधील ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावीत यांच्या ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेशाचे.
मुंबई, ठाण्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण होऊ लागल्याने महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या अनुषंगाने तयारी करण्याचे आदेश प्रमुख नेत्यांनी शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय पक्षबांधणी सुरु झाली आहे. त्यानुसार पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी पक्ष प्रवेश सुरु आहेत. त्यानुसार आज ठाण्यात नाशिकमधील उद्धव ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. गावित यांचा जय महाराष्ट्र्र हा उद्धवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्यासोबत श्रमिक वर्तमान कामगार संघटनेच्या शालेय पोषण आघार समितीचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार, नाशिक जिल्हा परिषदेच्या उबाठाच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित यांच्यासह इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा देताना बहिणी मोठ्या संख्येने दिसत असून भाऊ कमी आहेत असे म्हणत लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजना कदापी बंद होणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने टप्प्याटप्याने पूर्ण करणार, याचा पुनरुच्चार केला. लोक उलट सुलट चर्चा करीत असतात, त्यांच्या चर्चाना आपल्याला उत्तर देण्याची गरज नाही. तसेच शालेय पोषण आहार योजनेसाठी काम करणाऱ्या महिलांचा मानधनवाढीचा विषयाबाबत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून सकारात्मक मार्ग काढू असे शिंदे यांनी आश्वस्त केले.