
Eknath Shinde remark
ठाणे : अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तर ते तीन वर्षांपूर्वी आडवे झाले, त्यातून अजून सावरले नाही. आता कुणाच तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उठेगा नही, हे बोलणे त्यांना शोभत नाही. मराठी भाषेबद्दल राज ठाकरेंची तळमळ दिसून आली तर उबाठाच्या भाषणात आगपाखड, द्वेष, जळजळ, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मळमळ दिसून आली. त्यांनी मराठीचा नाही तर स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला, अशी घणाघाती टीका करीत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी दाढीवरून पूर्ण हात फिरवला असता तर काय झाले असते, याचा विचार करावा, टोला उद्धव ठाकरे यांना दिला.
मुंबई येथील वरळी भागातील एनएससीआय डोम येथे शिवसेना (ठाकरे) आणि मनसेचा हिंदी सक्ती आदेश रद्दच्या निर्णयाचा विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरी शैलीत टिका केली. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत प्रतिउत्तर दिले. २०२२ मध्ये दाढीवरून अर्धा हात फिरवला होता. अन्यायाविरुद्ध आम्ही उठाव केला. तेव्हापासून ते आडवे झाले. त्यातून सावरले नाही. अजूनही आडवेच झालेले आहेत. आता कुणाच तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उठेगा नही. हे बोलणे त्यांना शोभत नाही. मनगटात जोर लागतो फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही, असा टोला ही शिंदे यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, काहीजण झेंडा नाही, अजेंडा नाही असे बोलत होते. मात्र एकाने ते पथ्य पाळले तर दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला. आजच्या मेळाव्यातून मराठी माणसांची निराशा झाली.
मराठीसाठी काय केले असे विचारणाऱ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री असताना राज्य गीताचा आम्ही निर्णय घेतला, त्याच राज्य गीताने सोहळ्याची सुरुवात झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा आम्ही निर्णय घेतला. या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ होकार दिला. आज पंतप्रधान मोदींवर देखील टीका करण्यात आली, हे दुर्दैव आहे. यातून ठाकरे यांची वृत्ती, द्वेष आणि सत्तेसाठीची लाचारी आणि लालसा दिसून आली, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. खरं तर हिंदी सक्तीचा माशेलकर समितीचा अहवाल मान्य केल्याबद्दल ठाकरे यांनी मराठी माणसांची माफी मागायला हवी होती, मात्र त्यांनी व्यासपीठाचा राजकीय आराखडा केला. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला का गेला, मराठी टक्का कमी का होत गेला याच उत्तर उबाठाने द्यायला हवे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. फ्लावर आणि फायर कोण हे आगामी निवणुकीत दिसून येईल असा इशारा देत शिंदे म्हणाले लोकशाहीत कुणाला कुणासोबत युती आघाडी करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तशा तशा अनेक घटना आपल्याला दिसतील, त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.