

Thane Former mayor joins Shiv Sena
ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेल्या सात माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश करून झटका देणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाडांना पुन्हा एकदा दुसरा मोठा झटका दिला आहे. माजी महापौर मनोहर साळवी यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी शनिवारी (दि.१०) शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे कळवा विभागात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्वच संपले असून केवळ वर्षा मोरे या माजी नगरसेविकेचा प्रवेश अद्याप शिवसेनेत झालेला नाही.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, माजी उपमहापौर गणेश साळवी, माजी नगरसेविका प्रमिला केणी, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, शिवसेना ठाणे जिल्हा संघटीका सौ.मिनाक्षी शिंदे, लता पाटील, युवा नेते मंदार केणी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणार असल्याचे निश्चित मानण्यात येत होते. विशेष करून कळवा विभागात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, हे सारे अंदाज फेल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीमुळे राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. शिंदेच्या या खेळीमुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाच. मात्र भाजपला देखील हा एक प्रकारचा इशारा देण्याचे काम शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते.
गुरुवारी माजी विरोधी पक्षनेत्या प्रेमिला केणी, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर माजी महापौर मनोहर साळवी, माजी नगरसेविका अपर्णा साळवी, मिलिंद साळवी, आणि आरती गायकवाड यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेत शनिवारी जाहीर प्रवेश केला आहे. हे सर्व जण शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, हे सर्व नगरसेवक गुरुवारी बाहेर असल्याने त्यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आता केवळ एक माजी नगरसेविका वर्षा मोरे या शिल्लक राहिल्या असून त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शिंदेच्या या खेळीमुळे आता कळव्यात सर्व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्वच संपले आहे.