Durga Devi Temple Kalyan : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान "आई दुर्गादेवी"

मंदिर परिसरातील आकर्षक रोषणाई, ढोल-ताशांचा गजर, भजन-कीर्तनाचे स्वर आणि किल्ल्याच्या पायथ्याशी भरणारी जत्रा यामुळे संपूर्ण परिसराला भक्ती, परंपरा आणि उत्साहाचे चैतन्य प्राप्त
Durga Devi Temple Kalyan
Durga Devi Temple Kalyanpudhari photo
Published on: 
Updated on: 

सापाड : योगेश गोडे

कल्याण शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा दुर्गाडी किल्ला आणि या किल्ल्यावर विराजमान असलेली आई दुर्गादेवी, हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. नवरात्रोत्सव सुरू झाला की दुर्गाडी किल्ल्याचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. देवीच्या दर्शनासाठी उसळणारी भाविकांची गर्दी, मंदिर परिसरातील आकर्षक रोषणाई, ढोल-ताशांचा गजर, भजन-कीर्तनाचे स्वर आणि किल्ल्याच्या पायथ्याशी भरणारी जत्रा यामुळे संपूर्ण परिसराला भक्ती, परंपरा आणि उत्साहाचे चैतन्य प्राप्त होते. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसह विविध भागांतून भाविक आई दुर्गादेवीच्या दर्शनासाठी येथे येतात. त्यामुळे दुर्गाडीचा नवरात्रोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सोहळ्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी जोडलेले श्रद्धास्थान म्हणून कल्याण परिसराला ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान लाभले आहे. कल्याणची खाडी, व्यापारी मार्ग आणि सागरी दळणवळणाच्या दृष्टीने या परिसराला पूर्वीपासून विशेष महत्त्व होते. याच पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्याचा इतिहास स्वराज्याच्या संरक्षणाशी आणि कल्याणच्या ऐतिहासिक वारशाशी जोडला जातो.

Durga Devi Temple Kalyan
Palghar Banana Quality : डहाणूतील केळी पिकवण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह

लोकपरंपरेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याला महत्त्व प्राप्त करून दिले आणि देवी दुर्गेच्या आशीर्वादाने या स्थळाला धार्मिक महत्त्व लाभले. किल्ल्यावरील देवीच्या मंदिरामुळे या परिसराची ओळख अधिक दृढ झाली. इतिहास, लोकश्रद्धा आणि धार्मिक परंपरा यांचा संगम दुर्गाडी किल्ल्यावर अनुभवायला मिळतो. दुर्गाडी किल्ला हा कल्याणच्या इतिहासातील एक महत्त्वाचा ठेवा मानला जातो. हिंदवी स्वराज्याच्या सागरी सामर्थ्याच्या उभारणीशी कल्याणच्या खाडीचा संबंध जोडला जातो. त्यामुळे या किल्ल्याकडे धार्मिक स्थळ म्हणून नव्हे, तर ऐतिहासिक वारसा जपणारे ठिकाण म्हणूनही पाहिले जाते.

नवरात्रोत्सवाच्या काळात येथे येणाऱ्या भाविकांना देवीच्या दर्शनाबरोबरच या ऐतिहासिक भूमीशी जोडलेली परंपराही अनुभवता येते. दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रोत्सवाला 1969 मध्ये सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या उत्सवाच्या प्रारंभात महत्त्वाची भूमिका बजावली. आज अनेक वर्षांपासून हा उत्सव धार्मिक श्रद्धा, सामाजिक सहभाग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे. या परंपरेमुळे दुर्गाडीचा नवरात्रोत्सव कल्याणच्या धार्मिक-सामाजिक जीवनात विशेष स्थान मिळवून आहे.

दरवर्षी उत्सवाच्या काळात हजारो भाविक दररोज देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तर संपूर्ण नऊ दिवसांत लाखोंच्या संख्येने भाविक या परिसराला भेट देतात.दुर्गाडी देवीच्या नवरात्रोत्सवात कोळी समाजाची पारंपरिक पूजा-अर्चा असते. कल्याणच्या खाडीशी आणि स्थानिक जीवनपद्धतीशी ऐतिहासिक संबंध असलेल्या कोळी समाजाचा या उत्सवाशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. घटस्थापनेच्या दिवशी कोळी समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा केली जाते.

पारंपरिक वेशभूषा, पूजेचे ताट, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिभावाने सहभागी होणारे समाजबांधव यामुळे पहिल्या दिवसाच्या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. ही परंपरा स्थानिक समाजाचे सांस्कृतिक वैभव जपणारी आहे. धार्मिक उत्सवांमध्ये स्थानिक समाजाच्या परंपरांना मान देणे, नव्या पिढीपर्यंत त्या पोहोचवणे आणि ऐतिहासिक वारशाशी असलेले नाते जिवंत ठेवणे, या दृष्टीने दुर्गाडीवरील घटस्थापनेच्या पूजेचे महत्त्व आहे.

Durga Devi Temple Kalyan
Mumbai Bus Accident :घाटकोपरमध्ये बेस्ट बसला टँकरची धडक

दुर्गादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हा सोहळा श्रद्धेचा क्षण असतो, तर कोळी समाजासाठी तो परंपरा, संस्कृती आणि देवीप्रती असलेल्या निष्ठेचा उत्सव असतो.दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रोत्सव पूजाविधीपुरता मर्यादित नसतो. नऊ दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव मिळतो.

विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकार आणि वक्त्यांनी यापूर्वी या उत्सवाला उपस्थिती लावली. दादा कोंडके, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शाहीर साबळे आणि विठ्ठल उमप यांसारख्या मान्यवरांच्या सहभागाच्या आठवणी या उत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडल्या गेल्या आहेत. देवीच्या दर्शनासाठी उभारलेली व्यवस्था, सजावट आणि प्रवेशद्वारांची आकर्षक रचना भाविकांचे लक्ष वेधून घेते. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.

नवरात्रौत्सवात भक्तांसाठी मंदिर व्यवस्थापनाचे चोख नियोजन

गर्दीच्या वेळी भाविकांची सुरक्षित ये-जा, दर्शन रांगेचे नियोजन आणि परिसरातील शिस्त राखणे यांना प्राधान्य दिले जाते. लाखो भक्तांच्या श्रद्धेचा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापनाची भूमिका निर्णायक ठरते. दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रोत्सवाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात. यंदाच्या उत्सवाच्या काळात साधारण सात लाखांहून अधिक भाविक दुर्गाडी किल्ल्याला भेट देतील, असा अंदाज किल्ले दुर्गाडी समितीचे अध्यक्ष रवी पाटील यांनी व्यक्त केला.

काही वर्षांच्या उत्सवाबाबत स्थानिक पातळीवर सुमारे दहा लाख भाविकांच्या उपस्थितीचाही उल्लेख केला जातो. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हजारो कुटुंबे एकत्र येतात. भक्ती, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम येथे अनुभवायला मिळतो. दुर्गाडी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपणे, मंदिर परिसराचे संवर्धन करणे, उत्सवातील पारंपरिक प्रथा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि भाविकांसाठी सुरक्षित व सुयोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, ही काळाची गरज आहे.

आई दुर्गादेवीच्या दर्शनासाठी दरवर्षी जमणारा लाखो भक्तांचा जनसागर हेच दुर्गाडीच्या नवरात्रोत्सवाचे खरे वैभव आहे. इतिहासाची साक्ष देणारा किल्ला, भक्तीने भारलेले मंदिर आणि परंपरेचा वारसा जपणारा उत्सव यांमुळे दुर्गाडी देवी भाविकांचे श्रद्धेचे अढळ स्थान बनून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news