

डोंबिवली: डोंबिवलीतील सोनारपाडा ते पी अँड टी चौक उड्डाणपुलाच्या बांधकामाचे परिणाम काम सुरू होण्याआधीच दिसू लागले आहेत. मार्च २०२८ पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आल्याने डोंबिवलीकरांच्या कोंडीचा वनवास आणखी दीड वर्षे कायम राहणार आहे.
सोनारपाडा ते पी अँड टी चौक उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मानपाडा रोडवरील वाहतूक वळविण्यात आली असून, त्याचा फटका एमआयडीसी निवासी विभाग आणि कल्याण-शिळ महामार्गाला बसू लागला आहे.
काम सुरू होण्याआधीच वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि वाहनचालकांना रोजच्या प्रवासात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मानपाडा रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याने एमआयडीसी निवासी विभागातील अंतर्गत रस्ते आणि कल्याण-शिळ महामार्गावर वाहतूक कोंडीचा विळखा अधिक घट्ट झाला आहे.
वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिसूचनेनुसार मानपाडा रोडवरील वाहतुकीत ३१ मार्च २०२८ पर्यंत बदल करण्यात आले आहेत. जड-अवजड वाहनांना मानपाडा रोडवर बंदी घालण्यात आली असून, रिक्षा, कार आणि दुचाकींचे मार्गही वळविण्यात आले आहेत.
त्यामुळे वाहतुकीचा संपूर्ण भार एमआयडीसी निवासी विभागातील अरुंद रस्त्यांसह कल्याण-शिळ महामार्गावर पडला आहे. घरडा सर्कल परिसरातही वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.
दोन दिवसांपूर्वी निवासी विभागातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रोडवर रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार रक्तबंबाळ झाला. जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहतुकीचा वाढलेला ताण, अरुंद रस्ते आणि वाहनांची गर्दी यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
विकासकामे की जनतेची कोंडी?
कल्याण-शिळ महामार्गावर मेट्रोच्या संथ कामामुळे आधीच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी वाहतूक बदल लागू झाल्याने पुढील दीड वर्षाहून अधिक काळ वाहनधारकांना मनस्ताप होणार आहे. वाहतूक बदल करण्यापूर्वी लोकप्रतिनिधी, रहिवासी आणि रिक्षा संघटनांशी चर्चा करण्यात आली होती का, असा सवाल आहे.
आगामी काळात कल्याण-शिळ महामार्गावर मेट्रो पुलाखाली वाहनांसाठी उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्याने कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने पर्यायी मार्ग, वाहतूक नियोजन आणि अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.