Dombivli Smart Meter Row | डोंबिवलीमध्ये स्मार्ट मीटरवरून वाद पेटला : ४० सभासद असलेल्या सोसायटीला महावितरणची धमकी

२४ तासांत वीज तोडण्याच्या नोटीशीवरून रहिवाशांमध्ये तीव्र संताप
smart meter
smart meterPudhari
Published on: 
Updated on: 

Smart Meter Protest Dombivli

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये स्मार्ट मीटर लावण्यासाठी महावितरण आणि त्यांच्या खासगी ठेकेदारांमार्फत मोठी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला बहुतांशी रहिवासी सोसायट्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. काही सोसायट्यांनी आपल्या मीटर बॉक्सला कुलूप लावल्याने महावितरण आणि त्यांच्या ठेकेदाराला स्मार्ट मीटर बसवता येत नाही. या पार्श्वभूमीवर निवासी विभागातील ३ विंग आणि एकूण ४० रहिवासी सभासद असलेल्या साईदीप सोसायटीला महावितरणने २४ तासांची नोटीस बजावून खळबळ उडवून दिली आहे.

साईदीप सोसायटीने आपल्या विद्युत मीटर बॉक्सला कुलूप लावले असल्याने महावितरणला स्मार्ट मीटर लावता आले नाही. यापूर्वी देखील महावितरणने नोटीस देऊन स्मार्ट मीटर लावून घेण्यासाठी सांगितले होते. मात्र शुक्रवारी दुपारी महावितरण आणि त्यांचे ठेकेदार थेट साईदीप सोसायटीचे अध्यक्ष अमेय पारकर यांच्या घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे नोटीस देत २४ तासात स्मार्ट मीटर लावण्यासाठी संमती देऊन मीटर बॉक्सला लावलेले कुलूप काढून घ्यावे. अन्यथा पूर्ण सोसायटीचा वीज पुरवठा २४ तासानंतर खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला. विशेष म्हणजे सदर नोटीसीवर तारीख १३/१०/२०२६ अशी नमूद असल्याचे समोर आले आहे.

smart meter
Dombivli Water Shutdown | डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा; मंगळवारी तब्बल १६ तास पाणीपुरवठा बंद राहणार

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अमेय पारकर कामावर असल्याने घरी नव्हते. मात्र ही बाब समजताच अमेय पारकर यांनी सोसायटीच्या इतर पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून महावितरण आणि त्यांच्या ठेकेदारांच्या या मनमानी विरोधात समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल केली. सर्व लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्ये संदर्भात तातडीने बैठक आयोजित करून वीज ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी केली आहे.

साईदीप सोसायटीचे पदाधिकारी या प्रकाराबाबत लवकरच महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन भेट घेणार आहेत. अशाच प्रकारच्या नोटिसा इंद्रनील सोसायटीसह इतर मोठ्या सोसायट्यांना देखील आल्या आहेत. सध्या महावितरणच्या ठेकेदारांनी जास्त सभासद असलेल्या रहिवासी सोसायट्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

smart meter
Dombivli Water Theft | काटई-बदलापूर महामार्गावर पाणी चोऱ्यांचा भांडाफोड; एमआयडीसीने तोडली ४७ चोरटी कनेक्शन्स

त्यामुळे निवासी विभागातील वीज ग्राहक संतापले असून त्यांनी शासनाच्या या धोरणाबाबत सामाजिक माध्यमांवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भविष्यात जर स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती आणि वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी कायम राहिली तर ग्राहकांचा रोष तीव्र होऊन मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी वर्तविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.