

Elderly Abuse In Public
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात कैफियत मांडण्यासाठी सरसावलेल्या एका डोंबिवलीकर वृद्धाला केडीएमसीच्या ताफ्यातील काहींनी बखोटे पकडून मागे ओढले. हा प्रकार पाहून आयुक्त भडकले. त्यांनी वृद्धाची कैफियत ऐकून घेतली. तुमच्यासाठीच तर आलोय, असे सांगणाऱ्या आयुक्तांनी स्टेशन परिसरातील विदारक दृश्य पाहून उपस्थित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. मंगळवारी आयुक्त अभिनव गोयल यांनी डोंबिवलीत जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी शहरात पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान हा सारा प्रकार घडला.
स्टेशन परिसरातील पाहणी दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ डोंबिवलीकर रस्त्यांतील खड्ड्यांची समस्या मांडण्यासाठी पुढे आले. त्यावेळी आयुक्तांच्या सोबत असलेले वरिष्ठ अधिकारी काहीसे चिडले. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्यांनी या ज्येष्ठाला बखोटे पकडून मागे खेचण्याचा प्रयत्न केला. हे पाहून आयुक्त अभिनव गोयल यांनी या वृद्धाशी आपुलकीने संवाद साधत त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. एकीकडे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा, तर दुसरीकडे आपुलकीने बोलणारे आयुक्त हा प्रशासनकर्त्यांतील फरक या निमित्ताने दिसून आला.
कल्याण-डोंबिवलीच्या इतिहासात आतापर्यंत अनेक आयुक्तांचे जनता दरबार पार पडले. मात्र डोंबिवलीत असे जनता दरबार आयोजित केले जात नव्हते असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी अचानक डोंबिवली स्टेशन परिसरात भेट दिली. पण चित्र वेगळे होते. आयुक्त येणार म्हणून स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला होता.
एका वृद्धाने रस्त्यातील खड्डे कधी बुजविणार असा प्रश्न विचारला. यावर शांतपणे उत्तर देत आपण सर्व पाहणी करण्यासाठी इकडे आलो आहोत, असे आयुक्तांनी उत्तर दिले. रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले होते हे पाहून आयुक्तांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. कशा प्रकारचे नियोजन करता ? असा सवाल करत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी स्वच्छतेचे निर्देश दिले. संध्याकाळची वाहतूक कोंडी, प्रवाशांच्या शेअर रिक्षासाठी लागणाऱ्या लाईन, केडीएमटीच्या अपुऱ्या बसेस आणि प्रवाशांची गर्दी पाहून जास्तीत जास्त परिवहन सेवा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून यापुढेही अशाच पद्धतीने जनता दरबार घेणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.