

डोंबिवली : पूर्वेकडील गोग्रासवाडीत आलेल्या प्रकाश विद्यालयासमोर गोशाळा आहे. या गोशाळेतील काढलेले शेण मोठ्या प्रमाणावर साठले आहे. या शेणात एक शाळकरी मुलगी पडली. एकीकडे जागरूक रहिवाशांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या मुलीला शेणातून कसेबसे बाहेर काढून तिचे प्राण वाचविले, मात्र दुसरीकडे वारंवार लक्ष वेधूनही रस्त्यावर शेण टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात असमर्थ ठरलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात गोग्रासवाडीतील रहिवाश्यांच्या संतापाचा एखाद्या दिवशी कडेलोट होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या संदर्भात मनसेचे मनसेचे माजी शहरप्रमुख मनोज घरत माहिती देताना म्हणाले, मंगळवारी दुपारच्या सुमारास एक शाळकरी मुलगी प्रकाश विद्यालयासमोरून जात होती. इतक्यात तेथील गोठ्यातून गाय अंगावर धावून आली, म्हणून स्वतःला वाचविण्यासाठी या मुलीने तेथून पळ काढला. मुलीला वाटले रस्ता असावा म्हणून तिने साठलेल्या शेणातून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कमरेच्या इतक्या खोल खड्ड्यात साठलेल्या शेणात ही मुलगी पडून अडकली. जसजशी ही मुलगी शेणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती तसतशी ती खोल शेणात जाऊ लागली. भयभीत झालेल्या मुलीने जीव वाचविण्यासाठी टाहो फोडला. बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र मुलीला बाहेर काढण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हता. हे पाहून तेथूनच जाणारे जागरूक पादचारी नितीन कदम व त्यांच्या मदतीला धावलेल्या एका महिलेने या शेणात अडकलेल्या शेणाच्या खड्ड्यात पडलेल्या मुलीला मोठ्या महत्प्रयाासाने बाहेर काढून तिचा जीव वाचविल्याचे मनोज घरत यांनी सांगितले.
मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीच्या मालकीच्या जागेत बेकायदा गोठा आहे. या गोठ्यामध्ये आसपासच्या इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीने या संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे वारंवार तक्रारीद्वारे लक्ष वेधले आहे शिवाय मनसेसह परिसरातील रहिवाशांच्या देखील या गोठ्या संदर्भात अनेकदा तक्रारी केले आहेत. मात्र केडीएमसी प्रशासन या गंभीर तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कमरेभर साठलेल्या शेणामुळे आज जशी दुर्घटना घडली तशी यापुढेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरातील त्रस्त रहिवाशांच्या संतापाचा एखादे दिवशी कडेलोट होण्याची शक्यता आहे. आम्ही देखिल केडीएमसी प्रशासनाला शेवटचा इशारा दिला आहे. गोठ्यावर कारवाई करण्यासह बेफिकीर फ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची तात्काळ येथून उचलबांगडी करावी, अन्यथा मनसे आपल्या खास शैलीत आंदोलन करील, असा इशारा दिल्याचे मनोज घरत यांनी सांगितले.