Dombivli Water Crisis | ऐन गणेशोत्सवात डोंबिवलीच्या निवासी विभागात पाण्याची भीषण टंचाई

पाणी वितरणाचे नियोजन फसले, आजदे गावासह एमआयडीसीच्या निवासी विभागातील रहिवासी प्रचंड त्रस्त
  Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on

Dombivli Ganeshotsav Water Scarcity

डोंबिवली : चक्क पावसाळ्यात सणासुदीच्या तोंडावर पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने डोंबिवली शहराला लागून असलेल्या आजदे गावासह एमआयडीसीच्या निवासी विभागातील रहिवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. मॉडेल स्कूल परिसरातील जय भवानी, नूतन प्रभात, सुदामा सावलीसह अनेक सोसायट्यांमध्ये केवळ रात्रीच्यावेळी काही तास अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने टाक्याच भरत नाहीत. घरात मात्र थेंबभरही नसल्याने संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

गणेशोत्सव अवघ्या दोनच दिवसांवर येऊन ठेपला असताना घरात पाणी नसल्याने रहिवाशांची मोठी पंचाईत झाली आहे. सणाच्या तयारीसाठी पाणीच नसेल तर सण साजरा कसा करायचा, असा सवाल नागरिक विचारत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही पाणीटंचाई संपूर्ण निवासी भागात नसून काही ठराविक परिसरातच जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. काही ठिकाणी पाणी चांगल्या दाबाने सुरळीत येत असताना आमच्याकडेच कमी दाबाने का, असा संशय रहिवाशांमध्ये निर्माण झाला असून या असमतोल पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. जर पाणीटंचाई खरीच असेल तर ती सर्व ठिकाणी सारखीच असली पाहिजे, अशी भूमिका रहिवाशांनी मांडली आहे.

  Water Supply
Dombivli News : लोढा हेवनमधील बेकायदा आठवडी बाजारावर केडीएमसीचा बुलडोझर; विरोध करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल

यंदा पाऊस चांगला झाला असून एमआयडीसीचे स्वतःचे बारवी धरण भरून वाहत असतानाही भर पावसाळ्यात रहिवाशांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीच्या निवासी विभागातील रहिवाशांना एमआयडीसीकडून, तर आसपासच्या परिसरातील रहिवाशांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीचे स्वतःचे धरण असताना देखील ग्राहकांना अशा पद्धतीने वेठीस धरणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे.

याच एमआयडीसीच्या निवासी विभागाला लागून असलेल्या आर एक्स २८ समोर असलेल्या आजदे गावातील जयराम स्मृती इमारतीतील २१ कुटुंबीयांवर पाणी टंचाईचे भीषण सावट पसरले आहे. या इमारतीतील रहिवाशांची पाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून परवड होत आहे. आजदे गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या या इमारतीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी ढुंकूनही पहात नाहीत.

  Water Supply
Dombivli News | ‘तुमच्या बँक खात्याचा सायबर फसवणुकीसाठी वापर झाला आहे’ : राजस्थान पोलिसांची नोटीस मिळताच डोंबिवलीकर गृहिणीने संपवले जीवन!

२१ कुटुंबीयांकडून वर्गणी काढून टँकरने पाणी मागवावे लागते. हे किती दिवस चालणार ? असा सवाल या इमारतीतील त्रस्त गृहिणींकडून विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी गोग्रासवाडी आणि सांगर्ली परिसरातील रहिवाशांनी चमचे मोर्चा काढून केडीएमसीकडे किमान चमचाभर पाणी द्या, अशी आर्त हाक दिली होती, आता तीच वेळ एमआयडीसीच्या निवासी विभागासह आसपासच्या परिसरातील रहिवाशांवर आली आहे.

...अन्यथा कार्यालयात बाप्पाचे विसर्जन

या संदर्भात एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास बघू, करू, तपासून पाहू अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप या भागातील रहिवाशांकडून केला आहे. पाणी टंचाई तातडीने दूर केली नाही तर आम्ही गणपती बाप्पाला घेऊन थेट एमआयडीसी कार्यालयावर धडकणार आणि तिथेच बाप्पाचे विसर्जन करणार, असा आक्रमक इशारा या परिसरातील देवेंद्र देशमुख, सागर पाटील, प्रसाद गुप्ते, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक रहिवाशांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news