

डोंबिवली : डोंबिवलीतील नाला दुर्घटनेला तीन महिन्यांनी कलाटणी मिळाली असून या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. उघड्या झाकणामुळे नाल्यात पडून आयुषचा मृत्यू झाला होता. झाकण उघडे राहिल्याने मुलाचा मृत्यू झाल्याने या हलगर्जीपणाला जबाबदार असलेल्या शासकीय आस्थापनेचा अधिकारी, ठेकेदार आणि संबंधित व्यक्तिंकडून सहा लाख रुपयांची वसुली करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
सप्टेंबर महिन्यात नवरात्रोत्सवाच्या कालावधीत पश्चिम डोंबिवलीतील जगदंबा माता मंदिराजवळ असलेल्या नाल्याला जोडणारे झाकण उघडे ठेवल्याने त्याच परिसरात राहणारा आयुष हा 13 वर्षीय मुलगा जेवण झाल्यानंतर हात धुण्यास गेला असता बेपत्ता झाला होता. उघड्या झाकणामुळे नाल्यात पडून आयुषचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला तीन महिन्यांनी कलाटणी मिळाली आहे.
रविवारी 28 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घटना घडली. तो परिसर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारित असला तरी तेथे एमएमआरडीएकडून बाह्यवळण रस्त्यावर पूल बांधण्याची कामे सुरू आहेत. आयुष ज्या ठिकाणी मरण पावला त्या परिसरातील रहिवाशांनी दिलेली माहिती आणि काही माध्यमांमार्फत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार दुर्घटना घडली त्या ठिकाणी एमएमआरडीएच्या ठेकेदाराकडून बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू आहे.
नाल्यावर पूल बांधला जात आहे. त्या ठिकाणी अवजड वाहने धावत असतात. या वाहनांमुळे नाल्यावरील झाकण तुटले होते. धोका होऊ नये यासाठी ठेकेदाराने तुटलेल्या झाकणाच्या चारही बाजूंनी रोधक उभे केले होते. याच दरम्यान या भागात जगदंबा माता मंदिरात नवरात्रोत्सव सुरू होता. तेथील नाल्यावर मंडप उभारून जवळच स्वयंपाकाची भांडी घासणे आणि जेवण झाल्यानंतर भाविकांना हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी पुरेशी विजेच्या दिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. नाल्यावरील तुटलेले झाकण कुणीतरी अज्ञात इसमाने सरकवले असावे. त्यातच आयोजकांकडून पुरेसे नियोजन करण्यात आले नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांकडून सांगण्यात आले.
दुर्घटना रात्रीच्या वेळेत घडली त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. नाला दुथडी भरून वाहत होता. जेवल्यानंतर आयुष हात धुण्यास गेला आणि नाल्यात पडला. हे पाहून एका स्थानिकाने जीवाची पर्वा न करता नाल्यात उडी मारून आयुषला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र नाल्यातील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाहत जाऊन आयुष एका झाडाच्या आडोशाला अडकला होता. स्थानिकांंसह अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढले होते.