

विटा : विटा ते कुंडल रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना गतिरोधकावरून उडून पडल्याने झालेल्या अपघात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सविता बाळासाहेब पाटील (वय 55, रा. शिरटे, ता. वाळवा) असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. याबाबत तुषार बाबुराव जाधव (वाझर, ता. खानापूर) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.
शिरटे येथील बाळासाहेब रामचंद्र पाटील आणि सविता पाटील हे दोघे दुचाकीवरून (एमएच 10 डीझेड 7951) इस्लामपूरहून विटामार्गे लेंगरे (ता. खानापूर) येथे नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी जात होते. विटा-कुंडल रस्त्यावर भवानीनगर येथे ते आले असता गतिरोधकावर दुचाकी आदळली. दुचाकीवर मागे बसलेल्या सविता पाटील रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जखमी झाल्या.
त्यांना नागरिकांनी विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सविता पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बाळासाहेब पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.