

डोंबिवली : डोंबिवलीतील माऊंटेनियर्स असोसिएशन संस्थेतर्फे आयोजित एव्हरेस्ट बेस कॅम्प हिमालय मोहीम प्रतिकूल वातावरणात यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली असून या मोहिमेत डोंबिवलीच्या पहिल्या नगरसेविका म्हणून डॉ. सुनीता पाटील यांनी सहभाग घेत हा मान पटकावला आहे, समुद्रसपाटीपासून ५ हजार ३६४ मीटर उंच असलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याची मॅडची ही तिसरी मोहीम होती.
२४ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ही मोहीम संस्थेचे अध्यक्ष सतीश गायकवाड आणि सचिव दिलीप भगत यांच्या कुशल आणि अनुभवी नेतृत्वाखाली पार पडली. सातत्याने बदलणारे वातावरण आणि मोठ्या प्रमाणात होणारा हिमवर्षाव अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मॅडच्या १३ सभासदांनी ही मोहीम यशस्वी करून दाखवली.
या मोहिमेत देवदत्त दिगवडेकर, प्रतिक दिगवडेकर, मनीष खरात, ज्योती जोशी, माया दिगवडेकर नायर, अभिजीत कुलकर्णी, राम गणपती, विश्वास जोशी, कैवल्य मोडक, सदानंद दांडेकर, पद्माकर गायकवाड आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांचा समावेश होता.
या सर्व सभासदांनी यापूर्वी हिमालयात चादर ट्रेक, मरका व्हॅली, सतोपंथ ट्रेक, तपोवन ट्रेक, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असे अनेक अवघड ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केले असून याही मोहिमेत त्यांच्या अनुभवाचा कस लागला आहे. हिमालयातील मोहीम प्रतिकूल वातावरणात यशस्वी करणाऱ्या डोंबिवलीच्या पहिल्या नगरसेविका म्हणून डॉ. सुनीता पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.