Dombivli Lake Pollution | डोंबिवलीच्या मिलापनगर तलावात सडलेल्या निर्माल्यामुळे हजारो मासे मृतावस्थेत

परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई फैलावण्याची भिती
Dombivli Milap Nagar Lake Dead Fish
Dombivli Milap Nagar Lake Dead Fish Pudhari
Published on
Updated on

Dombivli Milap Nagar Lake Dead Fish

डोंबिवली : एकीकडे शुक्रवारी सर्वत्र जागतिक पर्यावरणदिन साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच दुसरीकडे डोंबिवली एमआयडीसीच्या मिलापनगर तलावात माशांचा खच पडल्याचे आढळून आल्याने परिसरातील रहिवाशांसह पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हाच तलाव जो पूर्वी गणेश विसर्जन तलाव म्हणून ओळखला जात असे.

या तलावात गेल्या तीन दिवसांपासून हजारो मासे मृतावस्थेत तरंगताना दिसत आहेत. कडक उष्मा, तलावात टाकले जाणारे निर्माल्य आणि कचऱ्यामुळे पाणी दूषित होऊन ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने मासे मृत्यूमुखी पडत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई फैलावण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
  अजूनही या तलावात विविध जातींचे हजारो मासे आणि कासवे जिवंत असून त्यांना वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

Dombivli Milap Nagar Lake Dead Fish
Dombivli Gaming Zone Issue: डोंबिवलीतील ऐतिहासिक 52 चाळ रेल्वे मैदानावरील गेमिंग झोनच्या कामाला स्थगिती

याकडे केडीएमसीच्या स्वच्छता आणि पर्यावरण विभागाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. त्यातच हजारो मृत मासे कुजल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. केडीएमसीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तलावातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.

गुरूवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या रहिवाशांना हा धक्कादायक प्रकार दिसला. तलावाच्या काठावर आणि पाण्यावर हजारो मासे मृतावस्थेत तरंगत होते. काही मासे अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.

शुक्रवारी (दि. ५ ) जगभर पर्यावरण दिन साजरा होत असताना डोंबिवलीत मात्र तलावातील मासे मृतावस्थेत आढळल्याने पर्यावरण प्रेमींनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणच्या प्रसिद्ध काळा तलावातही अशीच घटना घडली होती. वारंवार तलावांतील मासे मृतावस्थेत का आढळत आहेत ? याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सखोल तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

Dombivli Milap Nagar Lake Dead Fish
Dombivli Crime | डोंबिवलीत वृद्धाला लुटून पसार झालेल्या ६ जणांना अटक: चेनसह २ दुचाकी जप्त

दहा वर्षांपासून विसर्जन बंदी...तरीही दुर्लक्ष

काही वर्षांपूर्वीही याच मिलापनगर तलावात मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाले होते. मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन आणि डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने केलेल्या याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देऊन गेल्या दहा वर्षांपासून या तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे. तरीही तलावाची नियमित साफसफाई होत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. काही नागरिक यात निर्माल्य आणि कचरा टाकत असल्याने पाणी अधिकच अस्वच्छ होत आहे. अनेक वर्षांत या तलावातील गाळही काढलेला नाही.

कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची मागणी

हा तलाव जिवंत ठेवायचा असेल तर येथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षक किंवा सफाई कर्मचारी नेमावा. सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि नियमित साफसफाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी वारंवार केली आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर हा तलाव नामशेष होईल, अशी भिती व्यक्त होत आहे. केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी तलावाच्या साफ-सफाईसाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसीने तलावातील पाण्याची आणि मृत माशांची प्रयोगशाळेत तपासणी करून अहवालानुसार पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.

उष्माघात की घातपात ? कारण अस्पष्ट

एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे कसे मृत झाले ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. वाढत्या उष्म्याच्या विपरीत परिणामासह निर्माल्य आणि कचऱ्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होऊन मासे मृत झाले की कुणी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक पाण्यात विषप्रयोग केला ? हे अद्याप अस्पष्ट आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे मनसेचे स्थानिक विभागाध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले. अनेक बेजबाबदार रहिवासी देवांच्या तसबिरी, प्लास्टिकच्या बाटल्या आणि निर्माल्य टाकून तलावात प्रदूषण करत असल्याचे स्वच्छतेदरम्यान उघडकीस आल्याचेही ते म्हणाले. किमान आतातरी या तलावाचे पावित्र्य राखण्यासाठी रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागाध्याश संजय चव्हाण यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.

Dombivli Milap Nagar Lake Dead Fish
Dombivli Crime : तक्रार भोवली; शेजाऱ्याची हत्या करून पळालेल्या आरोपीला अखेर अटक

आक्रमक मनसेचा प्रशासनाला जाब

या घटनेची भीषणता लक्षात घेता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नक्की कशामुळे हे मासे मृत पावले ?याची सखोल चौकशी करून या प्रकाराला जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेचे विभागाध्यक्ष संजय चव्हाण यांनी केली आहे. केडीएमसीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तलावातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. मात्र तलावातील पाण्यासह मृत माशांचे नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेत तपासणी पाठविण्याची मागणी विभागाध्यक्ष चव्हाण यांनी केली आहे. तर पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवरच अशी घटना घडल्याने पर्यावरण प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news