Dombivli Crime : तक्रार भोवली; शेजाऱ्याची हत्या करून पळालेल्या आरोपीला अखेर अटक

Dombivli Crime : तक्रार भोवली; शेजाऱ्याची हत्या करून पळालेल्या आरोपीला अखेर अटक
Published on
Updated on

डोंबिवली : घराच्या अनधिकृत बांधकामाबाबत पालिकेकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून शेजाऱ्याची निर्घृण हत्या करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला टिळकनगर पोलिसांनी कल्याण परिसरातून अटक केली आहे. रोहित शेलार असे या आरोपीचे नाव असून, प्रताप चौधरी (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खंबाळपाडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा भागात प्रताप चौधरी आणि रोहित शेलार हे शेजारी राहत होते. रोहितने केलेल्या घराच्या अनधिकृत बांधकामाची तक्रार प्रताप यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे (केडीएमसी) केली होती. या तक्रारीमुळे रोहितचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आणि त्याला हक्काचे घर सोडून भाड्याच्या घरात राहावे लागले. तेव्हापासून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.

घरात घुसून केला वार

मंगळवारी, २६ मे रोजी सायंकाळी पुन्हा एकदा या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या रोहितने थेट प्रतापच्या घरात घुसून धारदार चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने प्रतापचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर आरोपी रोहित शेलार घटनास्थळावरून फरार झाला होता.

तीन दिवसांच्या शोध मोहिमेला यश

घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली. डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तीन पथके आरोपीच्या शोधात होती. तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी कल्याण परिसरात सापळा रचून पोलिसांनी रोहितला अटक केली. शुक्रवारी त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news