Dombivli News | ‘पठ्ठ्याने’ प्लास्टर ऐवजी रुग्णाच्या पायाला पुठ्ठा बांधला, कल्याणच्या रूक्मिणीबाई रूग्णालयातील सफाई कामगार निलंबित!

प्लास्टरसाठी ४०० रूपयांची मागणी केल्याचा आरोप, केडीएमसीची तडकाफडकी कारवाई
पैसे न दिल्यामुळे प्लास्टरऐवजी रुग्णाच्या पायाला पुठ्ठा बांधण्यात आला!
पैसे न दिल्यामुळे प्लास्टरऐवजी रुग्णाच्या पायाला पुठ्ठा बांधण्यात आला!
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याणातील रूक्मिणीबाई रूग्णालयात प्लास्टरसाठी पैशांची मागणी केल्याप्रकरणी एका सफाई कामगाराला निलंबित करण्यात आले आहे. पैसे दिले नाहीत म्हणून रूग्णाच्या फ्रॅक्चर पायाला प्लास्टर ऐवजी पुठ्ठा बांधल्याची ही घटना गुरूवारी घडली होती. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनाने तात्काळ ही कारवाई केली.

  या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, गुरूवारी सायंकाळी ४ वाजता ५४ वर्षीय रूग्ण त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याने उपचारासाठी रूग्णालयात आला होता. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पायाला फ्रॅक्चर असल्याचे निदान करून पायाला आधार देऊन प्लास्टर लावण्याचा सल्ला दिला.

पैसे न दिल्यामुळे प्लास्टरऐवजी रुग्णाच्या पायाला पुठ्ठा बांधण्यात आला!
Kalyan Crime | कल्याणमध्ये तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव ? डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

त्यानुसार या रूग्णाला अपघात कक्षाच्या समोरील ड्रेसिंग रूममध्ये प्लास्टरसाठी नेण्यात आले. यावेळी तेथे उपस्थित सफाई कामगार मुकेश पंडित याने सदर रूग्णाच्या नातेवाईकांकडे प्लास्टरचे साहित्य आणण्यासाठी ४०० रूपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत म्हणून मुकेशने रूग्णाच्या फ्रॅक्चर पायाला प्लास्टर ऐवजी पुठ्ठा लावला. हा प्रकार समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती.

   मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, रूग्णालयात व अपघात कक्षात प्लास्टरसाठी लागणारे पुरेसे साहित्य उपलब्ध असतानाही मुकेश पंडित याने त्या रूग्णाकडे पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर कर्मचाऱ्याविरोधात यापूर्वीही अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वारंवार गैरहजर राहणे, ड्युटीवर वेळेवर न येणे इत्यादी बाबीही निदर्शनास आल्या आहेत.

महानगरपालिकेसह रूग्णालयाची बदनामी झाल्याचा ठपका ठेवून सफाई कामगार मुकेश पंडित याला दैनंदिन कामकाजात गैरवर्तन व कर्तव्यात कसूरी केल्याचे जबाबदार धरून महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील कलम ४ नुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्याची विभागीय चौकशीही करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news