

Kalyan Facebook Fraud
डोंबिवली : फेसबुकवरून झालेली ओळख, प्रेमाचं गोड बोलणं आणि लग्नाचं स्वप्न, हेच एका ३५ वर्षीय दिव्यांग महिलेच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. कौटुंबिक वादामुळे २०२५ मध्ये घटस्फोट झालेल्या, डाव्या पायाने अपंग असलेल्या या महिलेला पुन्हा एकदा सुखाचा संसार थाटायचा होता. फेसबुकवर मैत्री करणाऱ्याने आधी अपंग असूनही स्वीकारले, नंतर घरच्यांच्या विरोधामुळे नाकारले. कर्ज मात्र तिच्याच माथी मारणाऱ्या फेसबुक फ्रेंडने अशा प्रकारे दुहेरी फसवणूक केली. दरमहा हप्ता भरताना अश्रू ढाळणाऱ्या लेकीची कहाणी पोलिसांनी सरकारी दप्तरी नोंदवून तिला मदतीचा हात दिला.
कल्याण पूर्वेकडे असलेल्या वालधुनी परिसरात राहत असताना २०२५ मध्ये फेसबुकवर तिची अब्दुल्ला लियाकत अली मणियार (३५) याच्याशी ओळख झाली. माझाही चार वर्षांपूर्वी घटस्फोट झालाय, मी तुला समजू शकतो, असे म्हणत त्याने मैत्री वाढवली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर लग्नाच्या प्रस्तावात झाले. एकाकी आयुष्यात पुन्हा आधार मिळणार या आशेवर तिने त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. मात्र हाच विश्वास तिला महागात पडणार होता.
घरगुती व आर्थिक अडचणी आहेत, मला आठ लाख रुपयांची गरज आहे, तुझ्या नावावर कर्ज काढ, त्याचे हप्ते मी भरतो, असे गोड बोलून त्याने तिला गळ घातली, लग्नाच्या विश्वासापोटी तिने १ जुलै २०२५ रोजी एका बँकेकडून पाच वर्षांच्या मुदतीसाठी ८ लाख ८० हजार ८१० रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर १ ते ४ जुलै २०२५ दरम्यान तिने ऑनलाईन बँक ट्रान्सफर, जी-पे व रोख स्वरूपात अब्दुल्ला मणियार याला ८ लाख रुपये दिले. मार्च २०२६ पर्यंत मुद्दल व व्याज परत करण्याबाबत त्याने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहूनही दिले होते. त्यामुळे तिला वाटले आता आपले आयुष्य सावरले.
दरम्यान, १३ जुलै २०२५ रोजी अब्दुल्ला कुटुंबीय व मित्रांसोबत कल्याण येथील घरी लग्नाच्या बोलण्यासाठी आला. त्या दिवशी तिच्या डोळ्यात नव्या संसाराची स्वप्नं होती, पण त्यानंतर त्याने आणि त्याच्या घरच्यांनी तुम्ही अपंग असल्याने काम करू शकत नाही, असे कारण देत लग्नास नकार दिला. ज्या अपंगत्वाला त्याने आधी स्वीकारल्याचे दाखवले होते, तेच अपंगत्व आता नकाराचे कारण बनले. सुरुवातीला त्याने कर्जाचे केवळ दोन हप्ते पाठवले आणि त्यानंतर हप्ते पाठवणे बंद केले. चौकशी केल्यानंतर त्याने तीन लाख रुपयांचे कर्ज फेडल्याचे आणि उर्वरित रक्कम ट्रेडिंगसाठी वापरल्याचे समोर आले.
आपला सिबिल रेकॉर्ड खराब होऊ नये म्हणून फिर्यादी स्वतः दरमहा हप्ते भरत आहेत. अपंग पायाने धडपडत, कष्ट करत ती आजही दरमहा हप्ता भरते आहे. पण मनातली जखम काही भरत नाही. नंतर अब्दुल्लाने संपर्क तोडून फोन उचलणेही बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर मात्र तिने पोलिसांच्या सहकार्याचा आधार घेण्याचे ठरविले. गुरूवारी १९ नोव्हेंबर रोजी नोंदविण्यात आलेल्या जबाबाच्या आधारे कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.