

डोंबिवली : गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने सर्वत्र हाह:कार माजविला आहे. परिणामी जमिनीत खोलवर असलेली बिळेही पाण्याने भरल्याने सरपटणारे प्राणी बाहेर पडून मानवी वस्त्यांत घुसू लागले आहेत. अशाच एका विषारी सर्पाने डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यात मावशीकडे राहण्यास गेलेल्या चिमुरडीला झोपेत डंख मारला. यात या चिमुरडीचा मृत्यू झाला, तर सर्पाचे विष भिनल्याने मावशी देखिल बाधित झाली. सद्या या मावशीवर ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
प्राणगी विकी भोईर (४) असे मृत मुलीचे नाव असून ही मुलगी डोंबिवली जवळच्या आजदे गावातील भागीरथी अपार्टमेंटमध्ये आपल्या आई-वडील आणि जुळी बहीण प्रांची हिच्या समवेत राहत होती. शनिवार/रविवार सुट्टी असल्याने नर्सरीत शिकणारी प्राणगी ही खंबाळपाड्यात राहणारी तिची मावशी बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर (२३) हिच्याकडे मुक्कामी गेली होती. शनिवार/रविवारच्या रात्री मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे हवेत प्रचंड गारठा निर्माण झाला होता. प्राणगी ही तिची मावशी बबली उर्फ श्रुती जवळ झोपली होती. गाढ झोपेत असताना सापाने प्रथम प्राणगीला चावा घेतला. त्यानंतर सापाने तिची मावशी बबली उर्फ श्रुतीलाही चावा घेतला.
सर्वाधिक विष भिनलेल्या प्राणगीला दवाखान्यात नेण्यापूर्वी जीवास मुकावे लागले. तर बबली उर्फ श्रुती हिच्याही शरीरात विष भिनल्यामुळे सुरूवातीला तिला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तथापी प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने तिची रवानगी ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. तेथे बबली उर्फ श्रुतीवर अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. सद्या तिची प्रकृती धोक्याबाहेर गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सद्या सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. पावसाचे पाणी बिळात शिरल्यामुळे साप बिळातून बाहेर पडून कोरड्या व सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्तीत घुसतात. यामुळे पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. नाग, फुरसे, घोणस, चापडा सारखे साप या काळात मोठ्या संख्येने आढळून येतात. कोरड्या जागेत राहणे साप पसंत करतात. पावसाचे पाणी बिळात शिरल्यानंतर ते कोरड्या जागी जाण्यासाठी घरांमध्ये शिरकाव करतात. घरात आणि घराभोवती कचरा व गवत वाढू देऊ नका, कारण हे सापांना आकर्षित करू शकते. बिळात पाणी शिरल्यावर साप बाहेर पडतात. अशा वेळी घराच्या कोपऱ्यात, उंदीर-घुशींच्या बिळात किंवा वाढलेल्या गवतात साप असू शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी लक्ष ठेवावे. विशेषतः बैठ्या घरांत राहणाऱ्या रहिवाशांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन भोईर आणि ठाकूर कुटुंबीयांचे निकटवर्तीय विजय भोईर यांनी केले आहे.