

डोंबिवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील हजारो कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी गावी जाणे सोयीचे व्हावे, यासाठी दिवा जंक्शनवरून ३८ फेऱ्यांच्या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे गणेशभक्तांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.
गौरी-गणपती उत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार आणि मनसे नेते राजू पाटील यांनी दिवा स्थानकावरून विशेष गाड्या सोडण्याची आणि अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीला रेल्वे प्रशासनाने तात्काळ प्रतिसाद दिला असून, दिवा व्यतिरिक्त कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मुंब्रा या चार स्थानकांवरही आरक्षण खिडक्या कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
२२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत दिवा-चिपळूण मेमू १०६३ अप आणि १०६४ डाऊन अशा १९ जोड्यांच्या एकूण ३८ फेऱ्या असलेल्या विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांसाठी IRCTC मोबाईल अॅप किंवा संकेतस्थळावरून ऑनलाईन आरक्षण करता येईल. तसेच, वरील पाच स्थानकांवरील आरक्षण खिडक्यांवर प्रत्यक्ष तिकीट आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. त्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने यंदा गणपती विशेष गाड्यांची संख्या वाढवली आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि त्यांना सुट्टीचा आनंद निर्बंधांशिवाय घेता येईल. गणेशभक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि गणेशोत्सवाचा आनंद आपल्या कुटुंबासोबत कोकणात साजरा करावा, असे आवाहन मनसे नेते राजू पाटील यांनी केले आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे कोकणवासीय गणेशभक्तांना प्रवासात मोठी सोय होणार असून, आरक्षणासाठीही अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.